Japan Airlines Boeing 737 Viral Video: शांघाय (चीन) ते टोकियो (जपान) जाणाऱ्या जपान एअरलाईन्सच्या (JL8696) विमानातील प्रवाशांनी एक धक्कादायक अनुभव अनुभवला. त्यांचे बोईंग ७३७ विमान अचानक २६,००० फूट खाली आले आणि त्यामुळे ऑक्सिजन मास्क खाली सोडावे लागले. प्रवाशांना वाटले की विमान आता कोसळणार आहे. काही झोपलेले प्रवासी अचानक जागे झाले, तर काहींनी आपली इच्छापत्रे लिहायला सुरुवात केली आणि आपल्या प्रियजनांना बँकेचे पिन, विम्याची माहिती अशा वैयक्तिक गोष्टींचे मेसेज पाठवायला सुरुवात केली.

हे विमान ३० जून रोजी शांघाय पूडोंग विमानतळावरून टोकियो नारिटा येथे जाण्यासाठी निघाले होते. हे उड्डाण जपान एअरलाईन्स आणि तिची उपकंपनी स्प्रिंग जपान यांच्या कोडशेअर करारांतर्गत चालवले जात होते. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, विमानात एकूण १९१ प्रवासी होते.

असोसिएटेड प्रेसच्या अहवालानुसार, स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे ६:५३ वाजता विमानाच्या उड्डाणादरम्यान यंत्रणेत बिघाड झाला, ज्यामुळे विमान सुमारे ३६,००० फूट उंचीवरून १० मिनिटांच्या आत थेट १०,५०० फुटांखाली आले.

विमानातील व्हिडीओ व्हायरल (Boeing 737 Japan Airlines Viral Video)

अहवालात असेही म्हटले आहे की, विमान खाली येत असताना दबाव प्रणालीचा अलर्ट सुरू झाला, त्यामुळे वैमानिकाने तात्काळ आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आणि विमानाला ओसाका येथील कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवले.

जसा कॅबिनमधला दाब कमी झाला, तसा ऑक्सिजन मास्क आपोआप खाली आला. विमानाच्या व्हिडीओमध्ये दिसतं की, प्रवासी घाबरलेले आहेत आणि ऑक्सिजन मास्क घालून बसले आहेत, तर एक एअर होस्टेस सूचना देत आहे. भीतीदायक वातावरण असूनसुद्धा विमान रात्री ८:५० वाजता ओसाका इथे सुखरूप उतरलं. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेमुळे बोईंग विमानांबाबतची आधीच वाढलेली चिंता आता अधिक वाढली आहे. गेल्या महिन्यात अहमदाबाद-लंडन मार्गावर बोईंग विमान अपघात झाला होता, ज्यात २७५ लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक वेळा अपघात होता होता टळले आणि त्यापैकी बहुतेक बोईंग विमानांमध्येच अशा घटना घडल्या होत्या. यामुळे बोईंग कंपनीच्या सुरक्षिततेवर अजूनच संशय वाढला आहे.