Jyoti Maurya Case Replica: उत्तर प्रदेशच्या पीसीएस अधिकारी ज्योती मौर्याचे प्रकरण अजून थंडावले नाही तोच झारखंडच्या साहेबगंजमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साहेबगंजच्या बांझी बाजारमध्ये राहणाऱ्या कन्हाई पंडित यांनी पत्नी कल्पना देवी हिच्या शिक्षणासाठी कर्ज काढून तिला पाठिंबा दिला होता. पण आता नर्स झाल्यावर १४ वर्षांचा संसार उघड्यावर टाकून ही महिला बेपत्ता झाली आहे असे समजतेय. कल्पना ही आपल्या १० वर्षांच्या लेकासह बेपत्ता आहे असा आरोप पती कान्हाई पंडित याने लगावला आहे.
या प्रकरणात, पीडितेच्या पतीने सांगितले की, त्याने आपल्या पत्नीला कर्जात बुडून शिक्षण दिले, तिला एएनएम बनवले आणि आता फसवणूक करून पत्नी आपल्या मुलासह बेपत्ता झाली आहे. त्याने गुरुवारी साहिबगंजचे एसडीपीओ राजेंद्र दुबे यांच्याशी संपर्क साधला आणि याप्रकरणी तपासाची विंनती केली आहे.
पीडित पती कन्हाई पंडित याने सांगितले की, २००९ मध्ये बोरीओ येथील तेलो बथान टोला गावातील राजकिशोर पंडित यांची मुलगी कल्पना कुमारी हिच्याशी त्याचे लग्न झाले होते. त्यांना १० वर्षांचा मुलगाही आहे. फारसे शिक्षण नसल्यामुळे तो ट्रॅक्टर चालवण्याचे काम करायचा. त्यांची पत्नी कल्पना यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले असून घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी तिला शिक्षण घेण्यास सांगितले. त्याने पत्नी कल्पना हिला बोरीओ कॉलेजमधून इंटरमिजिएट करायला लावले. त्यानंतर कर्ज घेऊन जमशेदपूरमध्ये एएनएमचे प्रशिक्षणही घेतले. या दरम्यान तो खूप कर्जात बुडाला, त्यानंतर पत्नीच्या सांगण्यावरून तो गुजरातला कामासाठी गेला होता.
पत्नी कल्पना हिला साहिबगंजच्या झुमावती हॉस्पिटलमध्ये एएनएम म्हणून नोकरी मिळाली होती. येथे पत्नीची नोकरी लागल्यावर पती होळीपूर्वी घरी परतला असता पत्नीची वागणूक बदलली होती. काही दिवसांनी तिने स्पष्टपणे या नात्यात राहायचे नाही असेही सांगितले. कान्हाई पत्नीसह सासरच्या घरी गेले व त्यांनी सासू आणि सासऱ्यांना याबाबत माहिती दिली.
दरम्यान, पत्नी माहेरी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली आणि मुलासह बेपत्ता झाली. दरम्यान, त्याने पत्नी व मुलाचा बराच शोध घेतला. सासरच्या घरीही जाऊन चौकशी केली, मात्र त्यांनी काहीही सांगितले नाही. पीडित पतीने सांगितले की, “मला खात्री आहे की माझी पत्नी कल्पना माझी फसवणूक करत आहे आणि दुसऱ्या प्रियकरसोबत राहत आहे. त्यांनी या प्रकरणाबाबत न्यायालयात धाव घेतली असून पोलिसांकडेही तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा<< ज्योती मौर्यसारखी सोडून जाशील म्हणत बायकोचं शिक्षण बंद करणाऱ्यांना पहिल्यांदाच ज्योती यांचं उत्तर; म्हणाल्या…
दुसरीकडे कल्पना यांच्या आई-वडिलांनी कान्हाई यांच्यावर हुंड्यासाठी हट्ट करत असल्याचे आरोप लगावले आहेत. कान्हाई कल्पना यांना मारहाण करत असत आणि आता कल्पनांच्या वडिलांनी लेक व नातवाच्या नावे केलेली संपत्ती आपल्या नावे करून घेण्यासाठी तो आटापिटा करत आहे असेही कल्पनाच्या आईवडिलांनी सांगितले आहे.