Little Girl Viral Video : मुलांवर लहान वयातच चांगले संस्कार करणं ही पालकांची जबाबदारी असते. काय चांगलं, काय वाईट या गोष्टी मुलांना पालकांनी सांगणं गरजेचं असतं. अन्यथा मुलं चुकीच्या गोष्टींचं अनुकरण करू लागतात. पालक मुलांना लाडाकोडात वागवताना नकळतपणे वाईट गोष्टींची सवय लावतात, ज्याचा परिणाम भविष्यात दिसून येतो. सध्या एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ती आपल्या आईला चक्क कानाखाली मारताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
विनोदी अर्थाने बनविलेला हा व्हिडीओ असला तरी त्यात चिमुकलीने आईच्या कानाखाली मारणं अनेकांना फारसं आवडलेलं नाही. त्यामुळे लोकही हा व्हिडीओ पाहून आई-वडिलांच्या संस्काराविषयी प्रतिक्रिया देत आहेत. कारण- रील असो किंवा इतर काही; पण त्यातून चिमुकलीनं आईला कानाखाली मारलेलं दाखवणं हे चिमुकलीला अशोभनीय आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया अनेक जण व्यक्त करीत आहेत.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक आई आणि तिची चिमुकली व्हॉइसओव्हर वापरून मजेशीर संभाषण करताना दिसतेय. याचदरम्यान चिमुकली डायलॉग बोलत आईच्या कानाखाली मारते. हा अभिनयाचा एक भाग होता; पण तरीही मुलांना अशा प्रकारे काही चुकीचे शिकवणे चुकीचेच आहे.
@Little.era12_officiral नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सही तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ती लहान आहे; पण तू तिची आई आहेस ना, तू असं शिकविताना विचार करायला हवा होतास. दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, मला ही रील मजेशीर वाटत नाही. तिसऱ्याने एकाने लिहिले की, हे दिवसेंदिवस अधिकाधिक भीषण होत आहे. तुम्ही तुमच्या मुलांना कंटेंडच्या नावाखाली काय शिकवत आहात, फार वाईट… शेवटी एकाने सल्ला दिला की, हे बरोबर नाही, मुलांना मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर ठेवा. त्यांना त्यांच्या आई- वडिलांना कानाखाली मारायला शिकवणं हे फार चुकीचं आहे.