Truck Driver Accident Viral Video: फक्त दोन सेकंद… आणि एक निरागस जीव गेलाच. ट्रकवर चढून तिरपाल (ताडपत्री) लावत असताना त्या माणसाला कल्पनाही नव्हती की, त्याला शेवटचा श्वास घ्यावा लागणार आहे. एक चूक, एक स्पर्श आणि क्षणार्धात ट्रकचं छत झालं मृत्यूचं व्यासपीठ. जे काही घडलं, ते सीसीटीव्हीत कैद झालं आणि पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येईल. नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घ्या…

उदयपूर (राजस्थान) येथून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डबोक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये केवळ दोन सेकंदांत एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूरच्या रिको इंडस्ट्रियल परिसरात मोदी केमिकल नावाच्या फॅक्टरीच्या बाहेर एक ट्रक माल खाली करण्यासाठी थांबला होता. माल उतरवून झाल्यानंतर चालक रामलाल गाडरी (वय ४०) ताडपत्री व्यवस्थित करण्यासाठी ट्रकवर चढला. त्याला कल्पनाही नव्हती की, तो त्याच्या वर गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युततारांच्या इतक्या जवळ पोहोचतो आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं की, रामलाल २ वाजून चार मिनिटांनी ट्रकवर चढतो. काही सेकंद तिरपाल ताडपत्री नीट करत असताना, अचानक तो उभा राहतो आणि त्याच क्षणी त्याचं डोकं वरील विद्युततारेला स्पर्श करतं. विजेच्या तारेला त्याचा चुकून स्पर्श झाला. त्याच वेळी एक प्रचंड दाबाची विजेची ठिणगी उसळते आणि तो क्षणार्धात ट्रकवर कोसळतो. अवघ्या दोन सेकंदांत त्याचा जागीच मृत्यू होतो.

या भयावह घटनेची माहिती मिळताच मृतकाचे नातेवाईक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने फॅक्टरीबाहेर जमले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन सुरू केले आणि फॅक्टरीमालकाला घटनास्थळी बोलावण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशीही ठाम भूमिका त्यांनी घेतली.

त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळाल्यावर एसडीएम आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी मृत्यूचे कारण अस्पष्ट होते. परंतु, दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतरच सत्य समोर आलं.

येथे पाहा व्हिडीओ

सध्या मृतकाचे कुटुंबीय आणि समाजातील लोकांनी फॅक्टरीसमोरच ठिय्या आंदोलन सुरू ठेवले असून, जबाबदार व्यक्तींवर कारवाई आणि योग्य मोबदल्याची मागणी ते करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारे येतील. सावध व्हा, कारण- चुकीचा एक क्षणही जीवावर बेतू शकतो.