Tea Seller: चहा म्हणजे चहाप्रेमींसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. हॉटेल, चहाची टपरी किंवा तंदुरी चहाचे दुकान आदी अनेक पर्याय चहाप्रेमींसाठी उपलब्ध असतात. तुम्ही आतापर्यंत गाणं गाऊन, शायरी ऐकवून, डान्स करून किंवा आणखीन वेगवेगळ्या स्टाईलमध्ये चहा विकणाऱ्या विक्रेत्यांना पाहिलं असेल. पण, आज अशा एका चहाविक्रेत्याची चर्चा होत आहे. हा चहाविक्रेता पावसाळा असो किंवा उन्हाळा मोबाईलवरून चहाच्या ऑर्डर घेतो. कोण आहे हा चहाविक्रेता? त्यांचे नाव काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

महादेव नाना माळी हे महाराष्ट्रातील धाराशिवमधील या गावातील रहिवासी आहेत. महादेव नाना माळी यांचे इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण झाले आहे. २० वर्षांपासून महादेव त्यांचा चहाचा व्यवसाय करीत आहेत. पण, या चहाविक्रेत्याने त्याच्या अनोख्या कल्पनेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोनवरून ऑर्डर घेण्याच्या त्यांच्या नावीन्यपूर्ण पद्धतीमुळे त्यांचा व्यवसाय एवढी वर्ष नियमितपणे सुरू आहे. हवामानाची पर्वा न करता, उन्हाळा, हिवाळा असो किंवा पावसाळा महादेव त्यांच्या ऑर्डर वेळेवर ग्राहकांपर्यंत पोहोचवतात.

हेही वाचा…‘आपण पाहुणे…’ हर्ष गोयंका यांच्या घराबाहेर बिबट्या, ब्लॅक पँथरचं दर्शन; CCTV फुटेजमध्ये कैद झालं दृश्य

एक कप चहाची किंमत किती ?

महादेव नाना माळी यांच्या आजूबाजूच्या परिसरात सुमारे १५ हजार नागरिक राहत असतील. तर त्यांच्यासह इतर नागरिकांसाठी चहा बनविण्यासाठी त्यांना दररोज ५० ते ६० लिटर दुधाची आवश्यकता असते. तसेच हा व्यवसाय चालविण्यासाठी ते त्यांची पत्नी आणि दोन मुलांची मदत घेतात. तसेच ते शेजारच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत दोन्ही गावांमध्ये सेवा देतात. तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी बनविलेल्या एक कप चहाची किंमत फक्त पाच रुपये आहे आणि ते दररोज १,५०० ते २,००० कप चहाची विक्री करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महादेव यांची दररोजची कमाई अंदाजे सात ते दहा हजार रुपये इतकी आहे. या कमाईने महादेव नाना माळी यांच्या घरखर्चाला हातभार लावला आहे. कमी पैशात, मोबाईलद्वारे ग्राहकांच्या ऑर्डर घेऊन महादेव नाना माळी चहा विकतात. त्यामुळे त्यांचे अनेक ग्राहक आहेत. तसेच याव्यतिरिक्त ते स्वतः या ऑर्डर देण्यासाठी जातात हीदेखील कौतुकाची गोष्ट आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मग तो लहान असो किंवा मोठा; फक्त तो व्यवसाय तुमच्या अनोख्या कल्पनेसह लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते हे महादेव नाना माळी यांच्या गोष्टीतून पाहायला मिळते.