CCTV footage Showing Forest Animals roaming outside Harsh Goenka's home : जंगलातील निरनिराळे प्राणी शहरात, मानवी वस्तीत दिसण्याच्या घटनांमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. जंगलतोड, अन्नाचा शोध, पाण्याचा तुडवडा आदी अनेक गोष्टींमुळे हे प्राणी मानवी वस्तीत शिरकाव करतात. तर आज प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी समूहाचे प्रमुख हर्ष गोयंका यांनासुद्धा या गोष्टीचा अनुभव आला आहे. त्यांच्या घराबाहेर त्यांना दोन जंगली प्राणी दिसले आहेत. त्यांनी हा अनुभव त्यांच्या युजर्सबरोबर खास कॅप्शनसहित शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओ तामिळनाडूचा आहे. तामिळनाडूच्या कुन्नूर येथे हर्ष गोयंका यांचं घर आहे. ३० जुलै रोजी त्यांच्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात एक दृश्य कैद झालं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या व जंगलातील सर्वात मोठी मांजर ब्लॅक पँथर यांचं दर्शन झालं आहे. दोन्ही प्राणी त्यांच्या घराबाहेरील रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. पहिला बिबट्या येतो, पण तो घाईघाईने जंगलात शिरतो; तर त्याचा साथीदार ब्लॅक पँथर वेळ काढून घरासमोर काही क्षण विश्रांती घेतो. हर्ष गोयंका यांच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेलं दृश्य तुम्हीसुद्धा पाहा. हेही वाचा…धावत्या एक्स्प्रेसवर दगडफेक; प्रवाशाच्या नाकाला गंभीर जखम अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘लवकरात लवकर त्याला…’ व्हिडीओ नक्की बघा… निसर्गाचा आदर करा : प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी हा सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे आणि सर्व युजर्सना एका खास गोष्टीची आठवण करून दिली आहे. त्यांनी लिहिलं की, 'एका गोष्टीची आठवण करून देतो की, आपण त्यांच्या परिसरात पाहुणे आहोत,” हॅशटॅग निसर्गाचा आदर करा (#RespectNature); अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे. या व्हिडीओला जवळजवळ १,४०० लाईक्स मिळाले आहेत आणि ही पोस्ट पाहताच अनेक युजर्सनी कमेंट्सचा वर्षावसुद्धा केला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांच्या अधिकृत @hvgoenka या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहताच आयएफएस (IFS) अधिकारी परवीन कासवान यांनी कमेंट केली आहे की, "मालक त्याच्या मालमत्तेच्या नियमित दौऱ्यावर आले आहेत." तर उद्योजिका रेबेका रॅडिसने आश्चर्य व्यक्त करत लिहिले की, “व्वा, तुमच्या घराबाहेर या प्राण्यांना पाहून खूप आनंद झाला!” आदी अनेक कमेंट पोस्टखाली दिसून आल्या आहेत.