Dahi Handi 2022: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा देशभरात मोठ्या दिमाखात पार पडला. कुठे कृष्णाला कोट्यवधी रुपयांचे दागिने अर्पण करून तर कुठे कान्हासाठी शेकडो पदार्थांचा नैवेद्य दाखवून जन्माष्टमी साजरी केली गेली. या सोहळ्यानिमित्त राजस्थान मधील एका मंदिरातील पूजेची प्रथा चर्चेत आहे. वल्लभ सांप्रदायातील सर्वात मोठे कृष्ण मंदिर म्हणजेच नाथजी द्वारा स्थापित श्रीनाथजी धाम. या मंदिरात वर्षाचे ३६५ दिवस भक्तांची गर्दी असते. साहजिकच कृष्ण जन्माष्टमीचा मोठा सोहळा या मंदिरात पार पडतो. विशेष म्हणजे जन्माष्टमीला या मंदिरात कृष्णाला २१ तोफांची सलामी दिली जाते. मागील ४०० वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.

उदयपूर वरून ४० किलोमीटर दूर अजमेर- जयपूर महामार्गावर श्रीनाथजी हे भगवान श्रीकृष्ण मंदिर आहे. मागील ४०० वर्षांपासून या मंदिरात बाळ कृष्णाच्या मूर्तीची पूजा केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्मानंतर म्हणजेच रात्री १२ वाजता मंदिरातील दोन तोफांमधून कान्हाला २१ तोफांची सलामी दिली जाते. या तोफा नर आणि मादी तोफा या नावांनी प्रसिद्ध आहेत. दरवर्षी प्रशिक्षित होमगार्ड्सच्या हस्ते ही तोफांची सलामी दिली जाते.

Dahi Handi 2022: अशी झाली होती दहीहंडीची सुरुवात; जाणून घ्या महत्त्व व इतिहास

याशिवाय श्रीनाथजी मंदिरातील आणखी एक प्रथा लक्ष वेधून घेते, ती म्हणजे या मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त सोबत तांदूळ घेऊन येतात. कृष्णच्या मूर्तीवर अक्षता अर्पण केल्या जातात ज्यानंतर मंदिरातील पुजाऱ्यांकडून हे तांदूळ तिजोरी मध्ये ठेवले जातात. या अक्षतांमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णच प्रतिबिंब दिसत असल्याची मान्यता आहे. ज्यांना हे प्रतिबिंब दिसते त्यांच्या घरी धन- धान्याची कधीच कमतरता जाणवत नाही अशीही भक्तांची भावना आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीनाथजी मंदिराचे व येथील कृष्णाच्या वास्तव्याची महती मोठी आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार १७९३ मध्ये या मंदिरावर नादीर शाह याने हल्ला केला होता, मात्र त्याने मंदिरात प्रवेश करताच त्याला अंधत्व आले. परिणामी कोणतीही लूटमार न करता त्याला मंदिराच्या बाहेर पडावे लागले पण बाहेर पडताच पुन्हा त्याची दृष्टी परत आली. या परिसराला श्रीनाथजी यांची नगरी म्हणूनही ओळखले जाते.