MahaShivratri 2024: शहर असो किंवा गाव प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक तरी शिव मंदिर दिसून येईल. पण, महाराष्ट्र्रात अशी काही शिवमंदिरे आहेत ज्यांनी प्राचीन संस्कृतीचा वारसा जपला आहे. ही मंदिर पुरातन बांधकामाचा एक उत्तम नमुना आहेत. र आज महाशिवरात्रीनिमित्त आपण महाराष्ट्रातील प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या काही शिवमंदिरांविषयी जाणून घेऊया…

१. मुंबईमध्ये असलेल्या अनेक शिव मंदिरांपैकी एक रम्य आणि देखणे शिव मंदिर म्हणजे ‘बाबुलनाथ’. श्रावण महिना, महाशिवरात्र आणि अन्य महत्त्वाच्या धार्मिक दिवशी येथे भाविकांच्या रांगाच रांगा पाहायला मिळतात. मलबाल हिलवरील या मंदिरामध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तत्पूर्वी मंदिराकडे जाण्यासाठी लागणारे प्रवेशद्वार अतिशय भव्य व सुंदर आहे. काळय़ा पाषाणातील या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.

२. मुंबई-गुजरात महामार्गावर विरार फाटा या ठिकाणी वसलेले ‘शेषनाग महादेव मंदिर’ आहे. येथे सहा फूट उंचीचे आकर्षक शिवलिंग आहे. मंदिरातील शिवलिंग लहान लहान शिवलिंगांनी चारही बाजूंनी घेरलेले आहे. माता पार्वती आणि शिव यांची सुंदर मूर्ती येथे आहे.

३. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील ‘अंबरेश्वर मंदिर’ म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना असल्याचे सांगितले जाते. जगातील सर्वांत प्राचीन वास्तूंपैकी एक अशा या मंदिराच्या गर्भगृहावर छप्पर नाही. त्यामुळे या मंदिराला अंबरेश्र्वर मंदिर, असे म्हटले जाते. मंदिरात महादेवाच्या स्वयंभू पिंडीची पूजा केली जाते. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती असून, त्यावर विविध देवतांची शिल्पे आहेत.

हेही वाचा…Women’s Day 2024: आंतरराष्ट्रीय महिलादिनी जांभळ्या रंगाला का आहे इतके महत्त्व? जाणून घ्या

४. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या डोंगररांगेमध्ये ‘तुंगारेश्वर मंदिर’ वसलेले आहे. हे मंदिर महादेवाला समर्पित आहे. या मंदिराच्या क्षेत्रात अनेक मानवनिर्मित कुंडे आहेत. डोंगररांगेत झाडांच्या गर्द हिरवाईत लपून बसलेले तुंगारेश्वरचे शिव मंदिर प्राचीन असून, ते नेहमी शिवभक्तांनी गजबजलेले असते. मंदिराभोवती असलेली झाडांची गर्दी पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते. इथला तुंगारेश्वर धबधबासुद्धा पाहण्यासारखा आहे.

५. महाराष्ट्र जिल्ह्यातील अहमदनगरमधील पाचनाई गावातील गिर्यारोहकांची पंढरी म्हणजे हरिश्चंद्रगडावरील ‘केदारेश्वर मंदिर’. या मंदिराजवळ असलेल्या गुहेत साधारण पाच फूट उंचीचे शिवलिंग आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६. श्री श्रेत्र सिद्धिगिरी महासंस्थान कणेरी मठ, कोल्हापूर इथे एक प्राचीन शिव मंदिर आहे. या मंदिराला ‘कडप्पा मंदिर’, असे संबोधले जाते. हे मंदिर सातव्या शतकापासून येथे आहे. मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या मध्यभागी गर्भगृह, मुख्य मंदिराला लागूनच नंदी मंडपासह शिवलिंग आहे. या मंदिराचे नक्षीकामसुद्धा अगदीच सुंदर आहे. तर आज आपण महाराष्ट्रातील काही शिव मंदिरांची माहिती जाणून घेतली. तुम्ही यापैकी कोणत्या शिव मंदिराला भेट दिली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.