सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगणे तसे अवघडच. प्रसिद्ध व्यक्तींबाबत तर ही समस्या जास्तच. नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजाई हिचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता मलालाचा असा कोणता फोटो आहे ज्यामुळे सोशल मीडियावर इतकी चर्चा रंगली आहे. तर या फोटोमध्ये मलालाने जीन्स आणि जॅकेट घातल्याचे दिसत आहे. या फोटोवरुन पाकिस्तानी युजर्समध्ये वेगळीच चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये असलेली मुलगी मलालाच असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नसतानाही सोशल मीडियावर मलालाविषयीच्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
सुरुवातीला हा फोटो Siasat.pk या पाकिस्तानी फेसबुक ग्रूपवर शेअर करण्यात आला. त्याखाली यूकेमध्ये मलाला युसूफजाई असे लिहिण्यात आले आहे. हा फोटो अवघ्या २४ तासांमध्ये २८०० हून अधिक जणांनी शेअर केला आहे. तर १७०० हून अधिक जणांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता हा फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरही शेअर केला जात आहे. पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांनीही हा फोटो शेअर करत त्याखाली प्रतिक्रिया लिहिली आहे. ते म्हणतात, सगळे केल्यानंतर मलालाचा एक असा फोटो ज्यामध्ये ती सामान्य महिलेप्रमाणे दिसत आहे. मात्र तिचे डोके कायम झाकलेले असते.
मलालाने जीन्स घालण्याबद्दलही अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. अनेकांनी तिची खिल्ली उडवत पोर्न स्टार मिया खलिफा हिच्याशी तिची तुलनी केली आहे. तर या फोटोमध्येही तिच्या डोक्यावर स्कार्फ असल्याने अनेकांनी ती स्कार्फ कधी सोडणार असा प्रश्नही विचारला आहे. सध्या ती ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेत आहे.