सोनं हे भारतीयांसाठीच नव्हे तर जगातील सर्वांसाठीच मौल्यवान. त्यासाठी व्यक्ती आपली हयात घालवते पै पै साठवून त्याची खरेदी करतात. मराठीत तर सोन्याहून पिवळे, चकाकते ते सोनेच नसते, सोन्याची किंमत असे वाक्यप्रचार आणि म्हणी रुढ आहेत. सोन्याची किंमत कितीही वाढली तरीही त्याची खरेदी केलीच जाते. पण तुम्हाला माहितीये जगात असाही एक देश आहे ज्याठिकाणी सोने नाल्यात आणि गटारीत वाहताना दिसते. आता ते कसे काय? तर स्वित्झर्लंडमधील नाल्यात आणि गटारीत चक्क सोनं वाहून दिलं जातं. संशोधकांनी मागील वर्षी केलेल्या एका संशोधनात एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे. संशोधकांना तब्बल तीन टन चांदी आणि ४३ किलो सोनं गटारीत आढळलं, याची किंमत जवळपास २० कोटी रुपये आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अशाप्रकारे नाल्यामध्ये सोनं-चांदी म्हटल्यावर लोक काहीही करुन ते मिळवणारच. पण त्यापूर्वीच संशोधकांनी स्पष्ट केलं आहे की, हे सर्व धातू सुक्ष्म कणांच्या रुपात असल्याने ते सामान्यपणे मिळू शकणार नाहीत. हे सर्व सोनं-चांदी आणि इतर धातू घड्याळ, औषधे आणि रासायनिक गोष्टींशी कंपन्या आपल्या उत्पादनासाठी या धातुंचा वापर करतात. त्यातून ते निघाले असल्याचं बोललं जात आहे.
खरं तर स्वित्झर्लंडला फार श्रीमंत आणि उद्योन्मुख शहर म्हणून ओळखं जातं आणि या संशोधनानंतर, ते खरंच श्रीमंत आहेत, असं म्हणायला हरकत नाही. या संशोधनात सहभागी असणारे प्रमुख शोधकर्ता बेस वेरिएन्स म्हणाले, आम्हाला या नाल्यांमध्ये कोणत्याच प्रकारचे दागिने आढळले नाहीत. मात्र सर्वाधिक सोनं पश्चिम स्वीस क्षेत्राशी संबंधित आहे. जास्त सोनं हे घड्याळाशी निगडीत कंपन्यांकडून मिळाले असून महागडी घड्याळे सजविण्यासाठी सोन्याचा वापर केला जातो.