Mumbai Local Trans Woman Dance Video : मुंबई लोकलने रोज लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे ही लोकल ट्रेन आता मुंबईकरांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग झाली आहे. आज अनेकांचे जगणे या लोकल ट्रेनवर अवलंबून आहे. नोकरी-धंद्यानिमित्त रोज गर्दीत धक्काबुक्की सहन करीत लाखो व्यक्ती प्रवास करतात. या प्रवासादरम्यान अनेकदा शिवीगाळ, हाणामारी, धक्काबुक्कीच्या घटना घडतात, ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. पण याचप्रवासादरम्यान अनेकदा अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्याने सर्व थकवा दूर होतो. चेहऱ्यावर स्मित फुलतं. सध्या मुंबई लोकल ट्रेनमधील असाच एक सुरेख व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आनंद फुलेल. त्यात एक तृतीयपंथी व्यक्ती टाळ्या वाजवून नाही, तर चक्क आपली कला सादर करून सन्मानाने पैसे कमावताना दिसतेय.

एक तृतीयपंथी चालत्या ट्रेनमध्ये आपली नृत्यकला सादर करून तिचे असे काही विचार मांडतेय की, जे विचार करायला भाग पाडणारे आहेत. आज देशात तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला नाही. त्यांना स्वत:च्या प्रत्येक हक्क, अस्तित्वासाठी लढा द्यावा लागतोय. पण, सोशल मीडियामुळे त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. सध्या मुंबई लोकलमधील अशाच एका तृतीयपंथीचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

लोकांसमोर मांडले स्वत:चे सुंदर विचार

या व्हिडीओत तृतीयपंथी धावत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात सुंदर नृत्यकला सादर करते. त्यानंतर ती प्रवाशांसमोर टाळ्या वाजवत हात न पसरता सन्मानाने पैसा कमवते. विशेष म्हणजे तिची आकर्षक नृत्यकला पाहून महिला प्रवासीखील तितक्याच आनंदाने तिला पैसे देतात. कृष्णामोहिनी असे या तृतीयपंथीचे नाव आहे, ज्यात तिने ‘इन आँखों की मस्ती’ गाण्यावर अतिशय तालात नाचतेय. त्यावेळी नाचताना तिच्या चेहऱ्यावरील प्रत्येक हावभाव पाहण्यासारखा आहे. हा व्हिडीओ चर्चगेट-भाईंदर एसी लोकलमधील आहे. यावेळी फक्त तिने आपली नृत्यकलाच सादर केली नाही. तिने त्यानंतर लोकांसमोर तिचे सुंदर विचारदेखील मांडले. मला भीक मागायची नाही, मला कठोर परिश्रम करायचे आहेत आणि सन्मानाने कमवायचे आहे. तिचे हे विचार ऐकून प्रवासीदेखील तिला समर्थन देतात. त्यानंतर ती डब्यात फिरते आणि लोक तिला स्वत:हून पैसे देतात. तिचा एकूणच सुंदर गेटअप पाहण्यासारखा असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mirabhayanderkar नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या डान्सचं कौतुक करीत व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत अनेकांनी त्यास दाद दिली आहे.