Mumbai Woman Confronts Passenger For Throwing Trash In Local : आपल्यातील बरेच जण मुंबई लोकलने प्रवास करतात. प्रवास करताना अनेक जण सिनेमा, सिरीज, बघतात तर काही जण भाजी निवडतात, तर भूक लागल्यावर नाश्ता सुद्धा करतात. पण, अनेक जण कचरा तिथेच फेकून देतात आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होते आहे; यामध्ये मुंबईतील एका महिलेने ट्रेनमध्ये कचरा टाकल्याबद्दल एका सहप्रवाशाला हाक मारली आणि एक्स (पोस्ट) वर तिच्याबद्दल निराशा व्यक्त केली.

कृष्णा दोशी यांनी पोस्ट केल्यानुसार तिच्या समोर बसलेल्या सहप्रवासी महिलेने ट्रेनच्या डब्यात भेळ खाल्ली होती आणि त्यातील बरेच कुरमुरे ती बसलेली तिथे पडलेले तर काही पंख्यामुळे उडून गेलेले दिसत होते. महिला इथपर्यंत थांबली नाही तर तिने भेळचा कागद देखील सीटवर बाजूला ठेवून दिला. हा सर्व प्रकार पाहून कृष्णा दोशी यांनी जाब विचारला तेव्हा तिने ‘मग अजून कुठं ठेवू?’ असे उत्तर दिले.

सर्वजण कचरा फेकतात, काहीही होत नाही (Viral Post)

उत्तर ऐकल्यानंतर तिने एक्स वर पोस्ट वर लिहिली की, “सार्वजनिक पायाभूत सुविधांबद्दल आदर नसलेल्या नागरिकांचा मला पूर्णपणे तिरस्कार आहे. बाईने भेळ खाल्ली आणि बहुतेक कुरमुरे जमिनीवर फेकले (त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त कुरमुरे पंख्याच्या हवेने उडून गेले म्हणून फोटोत दिसत नाहीत) आणि जेव्हा मी जाब विचारला तेव्हा ‘मग अजून कुठं ठेवू?’ असे उत्तर दिले”. मग यानंतर तिने महिलेचा चेहरा दिसत नसलेला आणि कचरा साचलेल्या जमिनीचा फोटोही शेअर केला आहे.

पोस्ट नक्की बघा…

सोशल मीडियावर ही पोस्ट @Krisha Doshii या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक युजर्सनी सार्वजनिक वाहतुकीत मूलभूत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रवाशांचे अनुभव शेअर केले आहेत. “मला खरोखरच त्रास होतो. त्यापैकी बहुतेक जणांना आपण कंट्रोल करू शकत नाही”, “मी एका काकांना ट्रेनमध्ये कचरा का फेकत आहे याबद्दल विचारले. त्यांनी सहज उत्तर दिले, ‘सर्वजण कचरा फेकतात, काहीही होत नाही”, “हे लोक कधीच सुधारणार नाहीत”; तर काही प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीत स्वच्छतेच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.