Viral Video Girl Playing Harmonium In Mumbai Local : माझ्याच वाटेला एवढा संघर्ष का, मलाच का एवढी मेहनत करावी लागते असे अनेकदा आपल्याला मनात येते. पण, अनेकदा आपल्याला संघर्ष करण्याच्या काळात एखादे मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला नकळत तयार केले जात असते. एखादा केर काढणारा असो किंवा एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी करणारा कर्मचारी प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष हा येतोच. त्यामुळे स्वतःचे पैसे कमवण्यासाठी, घर चालवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
लोकल ट्रेनमध्ये एक १३ वर्षांची सोनी नावाची मुलगी हार्मोनियम वाजवत होती; तिचे सादरीकरण पाहून प्रवासी मंत्रमुग्ध झाले आणि तिने या सादरीकरणाचा व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळाने सोनी स्टेशनवर उतरली. पण, तिची कला पाहून भारावून गेलेल्या प्रवाशाने तिच्याशी संवाद साधण्याचे ठरवले आणि ती सुद्धा स्टेशनवर उतरली. त्यानंतर मग प्रवासी आणि सोनीमध्ये संवाद सुरु झाला; जो एखाद्याच्या डोळ्यांत पाणी आणेल अगदी तसाच होता…
हसरा चेहरा आणि जबाबदारीची ताकद (Viral Video)
व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे हार्मोनियम वाजवण्याची कला तिला तिच्या वडिलांनी शिकवली. वडील देवाघरी गेल्यामुळे तिला आता ट्रेन प्रवासात हार्मोनियम वाजवून पैसे कमवावे लागतात. सकाळी ७ ते ८ पर्यंत शाळा, मग तिथून घरी जाऊन शाळेचा अभ्यास, त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ आणि रविवारी सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत दररोज दादर ते राम मंदिर असा प्रवास करते आणि हार्मोनियम वाजवते. यादरम्यान तिची बहीण घरी जेवण बनवते. चेहऱ्यावर भलीमोठी स्माईल ठेवून ही चिमुकली सोनी असा दररोज संघर्ष करत असते.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @artsy.cactuss आणि @manasichandi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “जर तुम्हाला सोनी कधी भेटली तर कृपया तिला मदत करा. तिला खरोखरच पाठिंब्याची गरज आहे. एवढी लहान मुलगी असूनही आतून खूप बलवान आहे. त्याचप्रमाणे तिचा हसरा चेहरा नेहमी लक्षात राहिलं असा आहे” ; अशी कॅप्शन प्रवाशाने व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “काही गोष्टी तुम्हाला नकळत आयुष्याचा खरा अर्थ सांगून जातात”, “तिच्या हसऱ्या चेहऱ्यात ज्ञानाची चमक आणि जबाबदारीची ताकद दिसते आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.