Mumbai Rains Viral Video: मुंबईतील पावसाने अक्षरशः कहर माजवला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठलं असून, नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळित झालं आहे. मात्र, या पावसातलं एक दृश्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. मुंबईत पावसानं गोंधळ उडवला असतानाच, गोरेगावमध्ये घडलं काही असं, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. मॉलचा गेट… पावसाचं पाणी… आणि त्यात पोहताना दिसलेली मुलं. हे दृश्य पाहून सोशल मीडियावर लोक म्हणतायत– ‘हा पाऊस आहे की मजा?’” गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलच्या मुख्य गेटवर इतकं पाणी साठलंय की, ते एखाद्या स्विमिंग पूलसारखं दिसू लागलं आहे.

होय! तुम्ही बरोबर वाचताय… मॉलच्या गेटबाहेर साठलेल्या या पाण्यात लहान मुले पोहताना, खेळताना दिसत आहेत. काहींनी तर पाण्यात उड्या मारत मजा केली आहे. तिथून जाणारे लोक हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर अपलोड करतायत आणि त्यामुळे हा व्हिडीओ काही तासांतच भन्नाट व्हायरल झाला आहे.

परंतु, या मजेशीर दृश्यामागे एक गंभीर बाजूही दडलेली आहे. पावसानं मुंबईचं जनजीवन अक्षरशः ठप्प केलं आहे. अनेक भागांत रस्ते तळ्याप्रमाणे भरून गेले आहेत, गाड्या बंद पडल्या आहेत, वाहतूक कासावीस झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांना स्पष्ट सूचना दिली आहे की, “अत्यावश्यक काम नसेल, तर घराबाहेर पडू नका.” कारण- या पाण्याखाली किती गटारं, उघडे मॅनहोल आणि खोल खड्डे दडलेले आहेत, हे कुणालाच माहीत नाही.

दरम्यान, भारतीय हवामान खात्यानं मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. पुढील काही तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शाळा-काॅलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण सतर्क झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत तातडीची बैठक घेतली आहे. त्यांनी सांगितलं की, पुढील ४८ तास मुंबईकरांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. सततच्या पावसामुळे परिस्थिती कधीही गंभीर वळण घेऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहनही केलं आहे.

एकीकडे पावसाच्या पाण्यात मुलांचा खेळ सुरू असताना दुसरीकडे संपूर्ण मुंबई ‘हाय अलर्ट’वर आहे. मॉलच्या गेटपाशी स्विमिंग पूलसारखं दृश्य दिसलं तरी या पावसानं मुंबईकरांच्या हृदयात धडकी भरली आहे.

येथे पाहा व्हिडीओ

आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न – पुढील काही तासांत मुंबईला पावसाचा आणखी प्रकोप सहन करावा लागणार का? की ही सगळी परिस्थिती निवळणार? उत्तरं येत्या दोन दिवसांत मिळणार आहेत.