इंडोनेशियाच्या समुद्रकिनाऱ्यावर विशाल असा जलचर प्राणी मृतावस्थेत आढळून आला. पण हा प्राणी नेमक्या कोणत्या प्रजातीचा आहे, याबाबत स्थानिकांनाही माहिती नाही. तेव्हा भलामोठा आणि विचित्र वाटणाऱ्या प्राण्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. समुद्र जीव अभ्यासकही मोठ्या संख्येने समुद्रकिनाऱ्यावर आले होते.

इंडोनेशियातील हुलूंग किनाऱ्यावर हा जलचर मृतावस्थेत वाहून आला होता. हा जलचर प्राणी १५ मीटर लांब आणि ३५ टन वजनाचा होता. हा प्राणी मृतावस्थेत वाहून आल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील पाण्याचा रंगही बदलत गेला. त्यामुळे स्थानिकांमध्ये आणखी भीती पसरली आहे. भलामोठा पण विचित्र दिसणाऱ्या हा जलचर प्राणी नेमका कोणता असावा, याचा अंदाज व्यक्त करता आलेला नाही. पण कदाचित हा शार्क असू शकतो, असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. मृतावस्थेत आढळलेल्या या प्राण्याला हटवताना मात्र, स्थानिकांच्या नाकीनऊ आले होते.

काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंडच्या मुरीवाई किनाऱ्यावर विचित्र दिसणारी वस्तू वाहून आली होती. वस्तूवर असंख्य जीव कवचातून बाहेर येण्यासाठी धडपडत होते. असे जीव आतापर्यंत कोणीच पाहिले नव्हते. अवाढव्य आकाराच्या वस्तूंवर चिकटलेले जीव लांबून फारच विचित्र दिसत होते. ज्यांनी किना-यावर आलेली वस्तू पाहिली त्यांचा चांगलाच थरकाप उडाला होता. त्यावेळी मुरीवाईच्या किना-यावर एलियनने आक्रमण केले आहे अशा अफवांनादेखील पेव फुटले होते. ही अज्ञात वस्तू ‘मुरीवाईचे भूत’ या नावाने प्रसिद्ध झाली होती; पण नंतर मात्र हे विचित्र जीव एलियन नसून समुद्रात राहणारे ‘गूस बर्नकल’ हे संधिपाद असल्याने लोकांना हायसे वाटले.