Mumbaikar playing garba in local train: नवरात्रीत सगळीकडे गरब्याचा क्रेझ असतो. मोठ्या प्रमाणात गरब्याचं आयोजनही केलं जातं. शिवाय ऑफिस, सोसायटी अशा ठिकाणी आवर्जून गरबा खेळला जातो. मात्र, मुंबईची एक खासियत आहे ती म्हणजे जसे अशा ठिकाणी सर्व सण साजरे केले जातात, तसेच मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकल ट्रेनमध्येही साजरे केले जातात. दरवर्षी नवरात्रीच्या दरम्यान लोकलमधील महिलांच्या डब्यात गरबा खेळण्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. याही वर्षी असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आले. मात्र, सध्या एक पुरूषांच्या डब्यातला व्हिडीओ व्हायरल होत आहे.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मुंबईकर लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना गरबा खेळताना दिसत आहेत. यावेळी गुजराती गरब्याचे संगीत या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे.
या व्हिडीओमध्ये पुरूष चालत्या ट्रेनमध्ये गोल करून पारंपारिक गरब्याच्या तालावर थिरकताना दिसत आहेत. तर बसलेले काही प्रवासी उत्साहाने टाळ्या वाजवत आहेत. भारतातील सणांची ऊर्जा ही संसर्गजन्य असते असं म्हणायला हरकत नाही. कारण गरब्याच्या ठेक्यावर शांत बसलेले प्रवासीही आनंदी झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि संपूर्ण भारतातील लोकांकडून त्याचे कौतुक होत आहे. अनेकांनी या प्रवाशांचे कौतुक केले आहे. आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अशाप्रकारे सण साजरे करताना पाहणाऱ्यांनाही तेवढाच उत्साह वाटतो. एका युजरने म्हटले की, गुज्जू आणि मुंबईकर दोघांनाही जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे माहीत आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, भारतातील ट्रेनमध्ये हे पाहून आनंद झाला. कदाचित गरबा जास्त वेळ नसेल पण गाणी वातावरण प्रसन्न करते.
नुकताच महिलांच्या डब्यातलाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दररोजचा लांबचा प्रवास आणि धावपळीच्या जीवनात हे असे क्षण आठवण करून देतात की आनंद कुठेही मिळू शकतो. ट्रॅफिक जॅम असो, गर्दीचा रस्ता असो किंवा धावती लोकल असो; मुंबई शहर सण साजरे करण्याचे मार्ग शोधतेच.