Nirjala Ekadashi Vrat Katha: हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी अनेक विष्णू भक्त उपवास करतात, त्यांची पूजा-आराधना करतात. एकादशी तिथी प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष अशा दोन्ही पक्षात साजरी केली जाते. सध्या ज्येष्ठ महिना सुरू असून या महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हटले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, या एकादशीचे व्रत केल्याने वर्षभरातील २४ एकादशी केल्याचे पुण्य प्राप्त होते. दरम्यान, सध्या गूगल ट्रेंडवरदेखील निर्जला एकादशी व्रतकथा हा कीवर्ड ट्रेंड होत आहे, त्यामुळे या एकादशीची कथा आपण जाणून घेऊ..
निर्जला एकादशी २०२५ शुभ मुहूर्त आणि तिथी
पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात ६ जून रोजी रात्री २ वाजून १५ मिनिटांनी होईल, तसेच ही तिथी ७ जून रोजी सकाळी ४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असेल. परंतु, उदयतिथीनुसार हे व्रत ६ जून रोजी केले जाईल.
शुभ वेळ
ब्रह्म मुहूर्त – पहाटे ४ वाजून ०२ मिनिटांपासून ते सकाळी ४ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असेल.
अभिजीत मुहूर्त – सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असेल.
एकादशी समाप्ती – पंचांगानुसार, निर्जला एकादशीची समाप्ती ७ जून रोजी सकाळी ०४ वाजून ४७ मिनिटांनी होईल.

निर्जला एकादशीची व्रतकथा
निर्जला एकादशीची व्रतकथा महाभारतातल्या भीमाशी संबंधित आहे, ज्यामुळे निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी म्हणूनदेखील ओळखले जाते. कथेनुसार, एके दिवशी भीमाने वेद व्यासांना सांगितले की, त्यांचे सर्व भाऊ दर महिन्याला दोन एकादशीचे व्रत करतात, परंतु माझ्यासाठी दर महिन्याला दोनदा एकादशीचे व्रत करणे अधिक कठीण आहे. त्यानंतर भीमाने वेद व्यासांना स्वर्गप्राप्ती करण्यासाठी मदत करणाऱ्या व्रताबद्दल सांगण्यास सांगितले. वेद व्यासांनी त्यांना निर्जला एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, हे व्रत केल्याने २४ एकादशीच्या व्रतांचे शुभ फळ मिळते आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळतो. या व्रताच्या वेळी अन्न आणि पाणी वर्ज्य असते, त्यामुळे या एकादशीला निर्जला एकादशी म्हटले जाते.