Plastic glove inside sandwich ordered via Zomato: सध्या ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवणं ही खूपच साधारण बाब आहे. मात्र, त्यामुळे आपणच आपल्या जीवाशी खेळत असल्याचे लोकांना कळतही नाही. झोमॅटो, स्विगी यासारख्या कंपन्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी व्यवसायात अग्रगण्य मानल्या जातात. या फूड डिलिव्हरीदरम्यान किती निष्काळजीपणा आहे हे दाखवणारा एक प्रकार नोएडात घडला. नेएडातील रहिवासी सतीश सरावगी यांनी झोमॅटोवरून सँडविच ऑर्डर केले. जसं आपण ऑर्डर करतो आणि आल्यावर खायला सुरूवात करतो तसंच त्यांनीही केलं. मात्र, सतीश यांनी सँडविच खायला सुरूवात केल्यावर त्यांना त्या सँडविचची चव थोडी विचित्र लागली. त्यांनी ते सँडविच पूर्ण उघडून पाहिल्यावर त्यांना मोठा धक्काच बसला.

सतीश यांनी ऑर्डर केलेल्या सँडविचमध्ये चक्क एक पूर्ण प्लास्टिकचे हँडग्लव्ज आढळले. सतीश यांनी लगेचच याचा फोटो काढला आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत पोस्ट केली. ही पोस्ट काही वेळातच व्हायरलही झाली. त्यानंतर झोमॅटो आणि ऑर्डर पाठवणाऱ्या कंपनीने लगेच माफी मागितली.

सतीश यांनी केलेल्या पोस्टनुसार, त्यांनी सलाड डेज इथून झोमॅटोमार्फत सँडविच ऑर्डर केले होते. त्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच ऑर्डर केले होते. याबाबत त्यांनी त्यांचा अनुभव शेअर करताना म्हटले की, “सँडविचमध्ये हँडग्लव्ज आढळले असून हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. तसंच यामुळे स्वच्छतेबाबत प्रश्न निर्माण होतो. याचा तपास झाला पाहिजे आणि मला लवकरात लवकर उत्तर हवं आहे.”

त्यानंतर झोमॅटोकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली. त्यांनी म्हटले की, “हे ऐकून आम्ही हैराणच झालो. आम्ही विचारही करू शकत नाही की हे आमच्या ग्राहकांसाठी किती त्रासदायक असेल. कृपया आम्हाला थोडा वेळ द्या म्हणजे आम्ही रेस्टॉरंट पार्टनरशी बोलून काय करू शकतो याबाबत तुमच्याशी संपर्क साधू.”

रेस्टॉरंट पार्टनर सलाड डेज यांनीही यावर प्रतिक्रिया देत माफी मागितली आहे. ते म्हणाले, “आम्ही हे प्रकरण अतिशय गंभीरतेने घेऊ. आम्ही आमच्या क्वालिटी अश्युरन्स टीमसोबत लगेचच याचा तपास सुरू केला आहे.”

दरम्यान, असा प्रकार घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. झोमॅटो तसंच स्विगीच्या बाबतही याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत.