Iran Isreal Conflict Fact Check Video : आठवडाभरापासून इस्रायल व इराण यांच्यामधील संघर्ष विकोपाला पोहोचला आहे. इस्रायलकडून इराणवर सातत्याने हवाई हल्ले केले जात आहेत, ज्याला इराणकडूनही प्रत्युत्तर दिले जातेय. त्यात बुधवारी तेल अवीव आणि तेहरान यांच्यातील नव्याने सुरू झालेल्या हवाई हल्ल्यांदरम्यान एका मानवाधिकार गटाने म्हटले आहे की, इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणमधील किमान ५८५ लोकांचा मृत्यू झाला आणि १३२६ हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त असोसिएटेड प्रेसने दिले आहे.
त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे आणि इराणला जाहीर इशारा देण्यास सुरुवात केली आहे. त्यात मंगळवारी ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अली हुसेनी खामेनी यांना ठार मारण्याबाबतचे थेट विधान केलेय. या सर्व घडामोडींत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे, ज्यात इराणने तेल अवीवमध्ये केलेल्या हल्ल्यानंतरच्या विध्वंसाचा दावा करण्यात आला आहे. पण, दावा केल्याप्रमाणे खरंच हा व्हिडीओ तेल अवीवमधील आहे का याविषयीचे सत्य जाणून घेऊ….
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर अँजेलो जिओलियानोने हा व्हिडीओ त्याच्या प्रोफाइलवर शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हाच व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
आम्हाला हा व्हिडीओ आणि त्यातील कीफ्रेम अनेक वेबसाइटवर आढळल्या.
वृत्तपत्रांमधील बातम्यांमध्ये म्हटले आहे : गुरुवार, २३ जानेवारीच्या संध्याकाळी उशिरा, युक्रेनच्या स्ट्राइक ड्रोनने रशियाच्या रियाझान या प्रांतामधील तेल रिफायनरीवर मोठा हल्ला केला. रशियन हवाई संरक्षण दलाने हा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. स्थानिक रहिवाशांनी सोशल मीडियावर किमान १० मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकल्याचे आणि त्यानंतर आगी लागल्याचे सांगितले.
आम्हाला एक्सवर याबद्दल एक पोस्टदेखील आढळली.
हा व्हिडीओ २४ जानेवारी २०२५ रोजी पोस्ट करण्यात आला होता.
आम्हाला द गार्डियनच्या YouTube चॅनेलवर या घटनेबद्दलचा एक व्हिडीओ रिपोर्टदेखील आढळला.
ज्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की : मॉस्कोच्या आग्नेयेकडील रियाझान क्षेत्रात ड्रोन हल्ल्याच्या वृत्तानंतर लोक जळत्या तेल रिफायनरीमधून पळताना दिसले.
निष्कर्ष :
युक्रेनच्या रशियातील तेल रिफायनरीवरील हल्ल्याचा जुना व्हिडीओ इराण-इस्रायल संघर्षातील अलीकडील घटनेचा सांगून शेअर केला जात आहे; परंतु व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.