CA Success Emotional Moment :आई-वडिलांच्या प्रेमाबाबत नेहमीच आईच्या मायेचे तोंडभरून कौतुक केले जाते पण, त्यामागचा वडिलांचा संघर्ष, त्यांचा वेदनादायक प्रवास क्वचितच एखाद्याला दिसतो. ते नेहमी आपल्या कुटुंबासाठी एखाद्या पर्वतासारखे संकटांसमोर उभे राहतात. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा आणि दु:ख मुलांच्या हास्यामागे दडवून ठेवतात. वडिलांना अनेकदा त्यांचे प्रेम व्यक्त करता नाही, पण ते प्रत्येक संकट स्वतःच्या अंगावर घेतात आणि घरच्यांना त्याचा थांगपत्ता लागू देत नाहीत.
आज अशीच एक भावनिक घटना समोर आली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. वडिलांच्या आयुष्यभराच्या कष्टांचं सोनं झालं… जे स्वप्न त्यांनी वर्षानुवर्षं मनात जपलं होतं, ते अखेर पूर्ण झालं. रोज कामावरून थकून घरी परतणाऱ्या त्या वडिलांना आज त्यांच्या मुलाने अभिमानाचा क्षण दिला आहे. हातात भाजीची पिशवी, चेहऱ्यावर दिवसाभराच्या कामाचा थकवा — पण डोळ्यांत चमक होती गर्वाची! पत्नीने दिलेल्या आनंदाच्या बातमीने त्यांच्या आयुष्यातील सगळे कष्ट, संघर्ष आणि त्यागाचं रूपांतर आनंदाश्रूंमध्ये झालं — “आपला मुलगा सीए झाला!”
एका वडिलांनी रोजप्रमाणे काम आटोपून हातात भाजीचा पिशवी घेऊन घरात पाऊल ठेवलं. त्यांना माहीत नव्हतं की घरात त्यांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण त्यांची वाट पाहत आहे. घरात प्रवेश करताच पत्नी भावुक होऊन अश्रूंनी म्हणाली – “सीए झाला आहे आपला!” मुलगा वडिलांच्या गळ्यात पडला आणि दोघे आनंदाने रडू लागले. त्या क्षणी वडिलांचे आयुष्यभराचे कष्ट, चिंता, त्याग आणि आशा सगळं काही त्या मिठीत सामावलं गेलं. आशेने सुरू झालेल्या स्वप्नांपासून ते चार्टर्ड अकाउंटंटच्या पदवीपर्यंतचा हा प्रवास केवळ त्याच्या स्वतःसाठीच नव्हता… तर त्याच्या कुटुंबासाठीही होता.
हा व्हिडिओ ‘रोशन सिन्हा’ नावाच्या नव्या चार्टर्ड अकाउंटंटचा असल्याचं सांगितलं जातं. लोकांनी या व्हिडिओखाली कमेंट करत लिहिलं – “याच दिवसासाठी मुलांनी मेहनत घेतली पाहिजे”, “वडिलांचं प्रेम कधीच शब्दात सांगता येत नाही.”
