PETA India Dog Milk AD To push Veganism : पेटा इंडिया (PETA India) पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त जाहिरात मोहिमेमुळे चर्चेत आले आहे. पेटाने वर्ल्ड मिल्क डेनिमित्त Veganism नावाची एक नवीन जाहिरात मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत त्यांनी मुंबई, अहमदाबाद, नोएडा आणि बंगळुरूसारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये मोठ-मोठे होर्डिंग लावले आहेत. या होर्डिंगवरील जाहिरातीत एक महिला चक्क श्वानाचे दूध पिताना दाखवण्यात आली आहे आणि त्यावर लिहिले आहे की, जर तुम्ही श्वानाचे दूध पित नाही, तर दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे दूध कसे पिऊ शकता? या जाहिरातीत याच मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी जाहिरातीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
श्वानाचं दूध पिणं एक घृणास्पद प्रकार, मग…
पेटाने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, ही मोहीम ‘स्पीशीझिज़्म’ला (speciesism) आव्हान देण्यासाठी आहे, म्हणजेच ज्या विचारसरणीत आपण काही प्राण्यांना प्राधान्य देतो आणि इतरांचे शोषण करतो. पेटाने लिहिले की, ‘गायी आणि म्हशींची जबरदस्तीने गर्भधारणा करणे, त्यांची पिल्लं हिसकावून घेणे आणि त्यांचे दूध सेवन करणे हे नैसर्गिकरित्या मान्य नाही. ज्यांना श्वानाचं दूध पिणं एक घृणास्पद प्रकार वाटतो, त्यांनी विचार करावा की इतर कोणत्याही प्राण्याचे दूध पिणे कसे काय योग्य असू शकते?
सोशल मीडियावर युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया
PETA ने या जाहिरात मोहिमेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच लोकांनी लगेच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले की, ‘हा मेसेज अधिक चांगल्या पद्धतीनेही देता आला असता. पण, हा थेट मेंदूवर हल्ला करण्यासारखा प्रकार आहे.’ दुसऱ्याने म्हटले की, ‘मी आता हे कसे दुर्लक्षित करू शकतो?’ तिसऱ्याने तीव्र शब्दात म्हटले की, ‘PETA च्या टीमने काही काळ इंटरनेटपासून दूर राहावे.’ काही लोकांनी तर ही ‘घृणास्पद आणि हास्यास्पद’ जाहिरात असल्याचे म्हटले आहे; तर काहींनी फोटोशॉप केलेल्या आणि अतिशयोक्तीपूर्ण मोहिमा व्हेगानिझमची प्रतिमा कलंकित करत असल्याची टिप्पणी केली आहे.
पण, काहींनी PETA च्या या जाहिरातीचे समर्थनदेखील केले आहे. एका युजरने लिहिले की, ‘जर हे तुम्हाला त्रास वाटत असेल, तर खरे सत्य किती त्रासदायक आहे याचा विचार करा. आम्ही प्राण्यांचे दूध पिणे सामान्य म्हणून स्वीकारले आहे, तर ते पूर्णपणे असामान्य आहे.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘सरकारने स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात व्हेगन मिल्कला प्रोत्साहन द्यावे, याचा अधिक परिणाम होईल.’