देशामधील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या नऊ जिल्ह्य़ांतील ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मोदींनी एक गंभीर चूक केली आणि त्यावरच आता काँग्रेसने मोदींवर निशाणा साधलाय. अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना पंतप्रधांनी देशामध्ये पॉझिटिव्ह केस वाढल्या पाहिजेत असं म्हटलं. करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी करण्याचं उद्देश समोर ठेवावं असं सांगताना मोदींनी चूकून करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढवण्यावर लक्ष द्यावं असं म्हटलं.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश : करोनामुळे भाजपाच्या पाचव्या आमदाराचा मृत्यू; योगी सरकारमधील मंत्र्याचं निधन

पंतप्रधा मोदी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतानाच एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. यामध्ये पंतप्रधान मोदी, “वेगाने पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढो, वेगाने चाचण्यांची संख्याही वाढवी या साऱ्या गोष्टींवर आपण भर दिला पाहिजे,” असं म्हणताना दिसतात. काँग्रेसने हा व्हायरल व्हिडीओ शेअर करत मोदींवर निशाणा साधालाय आणि मोदी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढवण्याच्या गोष्टी करत आहेत. डोक्यात जे आहे तेच त्यांच्या जीभेवर आलं आहे, असा टोला लगावलाय.

“प्रधानमंत्री पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी केवळ सांगत नसून पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारांमध्ये गर्दी जमा करुन त्यांनी याचं उदाहरणही दिलं आहे की पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कशी वाढवायची. तसंही जीभेवर तीच गोष्ट येते जी डोक्यात सुरु असते,” असं काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

काँग्रेसच नाही तर इतर काही अकाऊंटवरुनही मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी पंतप्रधानांवर यावरुन टीका केलीय.

मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला हा सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या स्थानिक गरजांप्रमाणे तुम्हाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे या वेळी मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आणि धोरणात्मक बदल केल्यास त्याची माहिती कोणत्याही दबावाखाली न येता द्यावी, असेही ते म्हणाले. लसीकरण हा करोनाशी लढण्याचा योग्य मार्ग आहे, त्यामुळे त्याबाबत ज्या अफवा पसरल्या आहेत त्याचे सामूहिकपणे उच्चाटन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.