देशात आणि जगात हातचलाखीने लुबाडणूक करणाऱ्या चोरांची कमतरता नाही. अनेकदा असे दिसून येते की, परदेशातील नागरिकांना विविध देशांतील सार्वजनिक वाहतुकीचे भाडे किंवा एखाद्या वस्तूच्या किमतीबद्दल योग्य माहिती नसते. अशा वेळी तेथील काही सार्वजनिक वाहनचालक किंवा दुकानदार या पर्यटकांची फसवणूक करतात. अशाच प्रकारे एक बांगलादेशी ब्लॉगर जोडपे भारतातील बंगळुरूला भेट देण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत जे काही घडले ते फारच विचित्र होते. एका रिक्षाचालकाने त्यांची हातचलाखीने आर्थिक फसवणूक केली; ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या जोडप्याबरोबर जे घडले ते कॅमेऱ्यात कैद झाले नसते, तर फसवणूक सिद्ध करणे आणि त्यावर विश्वास ठेवणे जवळजवळ अशक्य झाले असते. या घटनेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये हे जोडपे ब्लॉगिंगसाठी बंगळुरूला पोहोचले असून, त्यांनी संपूर्ण प्रवासात आपल्याबरोबर आणलेला कॅमेरा ऑन ठेवल्याचे दिसत आहे. बंगळुरूमध्ये रिक्षामधून उतरतानाही त्यांच्याकडील कॅमेरा ऑन होता; पण कदाचित रिक्षाचालकाला त्याची भणक लागली नाही.
बोलत असताना केली हातचलाखी
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हे जोडपे रिक्षाचालकाला ५०० रुपयांची नोट देते आणि उरलेले पैसे परत देईल याची वाट पाहत उभे असते. त्यादरम्यान रिक्षाचालक त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्याशी सतत बोलत राहतो आणि अत्यंत चलाखीने तो ५०० रुपयांची नोट आपल्या स्लीव्हमध्ये लपवतो आणि १०० रुपयांची नोट हातात घेतो. यावेळी तो त्या प्रवाशांनी केवळ १०० रुपयांची नोट दिल्यासारखे भासवतो. या जोडप्यातील एक जण रिक्षा चालकाला विचारतो की, अरे मी किती दिले? त्यावर रिक्षाचालक १०० रुपयांची नोट दाखवतो. त्यानंतर ते जोडपे १००रुपयांची नोट परत घेते आणि नंतर पुन्हा ५०० रुपयांची नोट देते.
अत्यंत चालाखीने लुटले दुप्पट पैसे
रिक्षाचालक अतिशय हुशारीने प्रवासी दाम्पत्याकडून दुप्पट पैसे घेतो. या जोडप्याने नंतर व्हिडीओ पाहिला तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यावर सदाशिवनगर वाहतूक पोलिसांनी त्याची दखल घेतली. पोलिसांनी त्या रिक्षाचालकाची ओळख पटवून त्याला पकडले असून, त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
‘भावा हा तर प्रोफेशनल चोर आहे…’
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर अनेक कमेंट्स केल्या. एका युजरने लिहिले की, भावा हा तर प्रोफेशनल चोर निघाला. दुसर्या एकाने लिहिले की, तो नक्कीच जादूगार आहे. त्याने किती लोकांची अशी फसवणूक केली असेल याचे आश्चर्य वाटते. त्यावर तिसऱ्या एका युजरने लिहिले की, त्याचा मुख्य व्यवसाय लूट करणे आहे, असे दिसते.