Viral Video: दिवाळीला अवघे काही दिवस बाकी आहेत. तसेच यादरम्यान बाजारात खरेदी करण्यासाठी गर्दी दिसते आहे. नवनवीन कपडे, विविध कंदील, पणत्या व रांगोळी यांनी मार्केट गजबजून गेलं आहे. दिवाळीत प्रत्येक दिवशी दारात रांगोळी काढली जाते आणि ज्यांना रांगोळी जमत नाही ते रांगोळीचा साचा वापरून रांगोळी काढतात. बाजारात विविध रांगोळीचे साचे उपलब्ध असतात. पण, एका युजरनं घरच्या घरी रांगोळीचा साचा कसा तयार करायचा हे एका व्हिडीओत दाखवलं आहे. तो व्हिडीओ बघून तुम्ही दिवाळीत रांगोळी सहजगत्या काढता यावी यासाठी रांगोळीचा साचा तयार करून बघू शकता.
रांगोळीचा साचा घरच्या घरी तयार कारण्यासाठी युजरची कृती :
- वहीचं एक पान घ्या.
- त्या वहीच्या पानाची घडी घाला. त्यानंतर पान उघडल्यानंतर तुम्हाला मधोमध एक रेष आलेली दिसेल. त्यानंतर रेषेच्या उजवीकडचा भाग कापून बाजूला काढून ठेवा.
- मग डावीकडच्या भाग घेऊन, त्या पानाची तीन वेळा घडी घाला; जोपर्यंत वहीच्या पानाचा आकार छोटा होत नाही तोपर्यंत.
- त्यानंतर वहीचं पान उघडताच तुम्हाला अनेक घड्या तयार झालेल्या दिसतील. वहीचं पान त्या घडीनुसार पुन्हा दुमडून घ्या.
- दुमडून घेतलेल्या वहीच्या पानावर एका कोपऱ्यात पेनानं पणतीचं अर्ध चित्र काढून घ्या आणि त्या चित्राला कैचीनं कापून घ्या.
- त्यानंतर वहीचं पान उघडून बघा तुम्हाला चार पणत्यांचा साचा तयार झालेला दिसेल.
- हा साचा तुम्ही रांगोळी काढताना वापरून, त्यात रंग भरून अगदी सहज रांगोळी काढू शकता.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @diplakshmi123 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हे एका महिलेचं अकाउंट आहे; जी सोशल मीडियावर स्वयंपाकाच्या टिप्स, तसेच रांगोळी काढण्याच्या विविध सोप्या पद्धती शेअर करीत असते. हा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘खूप छान’, ‘मस्त’ अशा शब्दांत महिलेचं कौतुक करताना दिसले आहेत. तसेच पेपरपासून तयार केलेला रांगोळीचा साचा अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.