Viral Video 70 Year Old Pune Grandmother Catches Snake : ‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पु. ल. देशपांडेंच्या कथाकथनापासून ते चारचौघांतील गप्पांमधूनही आपण पुण्यामधील अनेक गमतीशीर किस्से ऐकले असतीलच. पुन्हा आज त्याचेच प्रात्यक्षिक पाहायला मिळाले आहे. साप दिसला तरी आपल्यातील सगळेच आहेत तिथून पळ काढतील. पण, आज पुण्यातील एका आजीने सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे. त्यांनी गळ्यात साप घालून भारतात सापांविषयीचे असणारे गैरसमज दूर केले आहेत.
महाराष्ट्रातील पुण्यात ७० वर्षीय शकुंतला सुतार नावाच्या एक आजी आहेत. ही आजी पुण्यातील मुळशी तालुक्यातील कासार आंबोली गावात राहते. तर घडलं असं की, या आजीच्या घरात धामण साप घुसला. पण, तिने घाबरून न जाता किंवा कोणाचीही मदत न घेता, हिंमत आणि शांतपणे डोके वापरले आणि ती या कठीण प्रसंगाला सामोरी गेली. आजीने गोंधळ न घालता सापांविषयीच्या जागरूकतेसाठी आजीने सगळ्यात आधी सापाला फळीच्या मागून काढले. मग सापाला हातात घेऊन, तिने गळ्यात गुंडाळून घेतले.
प्रत्येक साप विषारी नसतो (Viral Video)
तिथे उपस्थित असलेल्या अनेकांना ते दृश्य पाहून धक्काच बसला. त्यापैकी बऱ्याच जणांनी तेथून पळ काढला. पण, शकुंतला सुतार शांत राहिल्या आणि त्यांनी या क्षणाचा उपयोग लोकांना सापांबद्दल शिक्षित करण्यासाठी केला. त्यांनी व्हिडीओत सांगितले, “साप दिसला की, घाबरून जाण्याची गरज नाही. प्रत्येक साप विषारी नसतो. उंदीर मारणारा साप माणसांना हानी पोहोचवत नाही. खरं तर, तो उंदीर आणि कीटक खातो म्हणूनच तो शेतीसाठी उपयुक्त आहे. लोक अनेकदा भीती आणि अंधश्रद्धेमुळे सापांना मारतात; जे चुकीचे आहे”.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @satyaagrahindia या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धासुद्धा आहेत. जगभरात विषारी आणि बिनविषारी असे दोन प्रकारचे साप आढळतात. पण, आज या आजीने व्हिडीओद्वारे धामण सापांविषयीची महत्त्वाची माहिती सांगून, अनेकांचे सापाबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल तिचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.