Red soil stories First video after Shirish’s death: कोकणाशी नाळ जोडलेले आणि हरहुन्नरी शिरीष आणि पूजा गवस यांचे ‘रेड सॉईल स्टोरीज’ नावाचे युट्यूब चॅनेल आता पुन्हा सुरू होत आहे. १ ऑगस्ट २०२५ रोजी शिरीष गवस या युट्यूब इन्फ्लुएंसरचा ब्रेन हॅमरेजमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या बातमीमुळे शिरीष गवस आणि पूजा गवस या जोडप्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला. आता जवळपास तीन महिन्यांनंतर ‘रेड सॉईल स्टोरीज’ नावाचं त्यांचं युट्यूब चॅनेल पुन्हा नव्याने सुरू होत आहे. शिरीष जरी आता या व्हिडीओजमध्ये दिसणार नसला तरी तो कायम सोबत असल्याची भावना शिरीषची पत्नी पूजा हिने व्यक्त केली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ पूजा गवस यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर रविवारी पोस्ट केला आहे.
“हसरा, प्रेमळ शिरीष चालता बोलता आम्हाला सोडून गेला. हे सर्व इतकं अचानक घडलं की पुढचे अनेक दिवस हे सत्य पचवणं खूप जड गेलं. एक उत्तम माणूस, परफेक्ट नवरा, जबाबदार मुलगा आणि प्रेमळ बाबा तो ठरला. एवढ्या कमी वेळात खूप काही अचिव्ह केलं. आम्ही दोघांनी मिळून सुरू केलेला हा प्रवास पुढे त्याच्याशिवाय करणं खूप कठीण आहे, पण अशक्य नाही. तेव्हा हे चॅनेल आता इथून पुढे सुरू राहील. त्यासाठी तुम्ही जे प्रेम दिले ते पुढेही असेच देत रहा आणि कायम पाठीशी रहा”, असे पूजा गवस हिने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
कोरोना काळात जेव्हा सर्वकाही ठप्प झालं होतं, तेव्हा मुंबईतल्या शिरीष गवस आणि त्याच्या पत्नीने एक वेगळंच ध्येय समोर ठेवलं. शिरीष हा आयटी क्षेत्रात काम करत होता, तर पत्नी पूजा सिनेसृष्टीत. कोरोनामध्ये दोघांनीही सिंधुदर्गातील त्यांच्या घराची वाट धरली. गावातील राहणीमान, खाद्यसंस्कृती, तिथले दैनंदिन जीवन, सणवार, परंपरा हे अगदी जवळून आणि सहज मांडणी करून दाखवण्याचा रेड साईल स्टोरीजचा प्रवास त्यांनी सुरू केला. काही काळातच त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यांची वाटचाल यशस्वीरित्या पुढे जात राहिली. त्यानंतर शिरीष आणि पूजा यांना २०२४मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी श्रीजा असं त्यांच्या मुलीचं नाव ठेवलं. मुलीच्या पहिल्या वाढदिवसांनंतर काहीच दिवसांत शिरीषची तब्येत प्रमाणाबाहेर खालावली आणि डॉक्टरांनी त्याच्या मेंदूतील ट्यूमरचे निदान केले.
नेमकं शिरीषला काय झालं होतं?
Red Soil stories या चॅनेलवरून शिरीषला नेमकं काय झालं होतं अशा शीर्षकाचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्याला नेमकं काय झालं होतं हे पूजा गवस हिने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. शिरीषच्या मृत्यूनंतर अनेक इन्फ्लुएंसरने चुकीच्या पद्धतीने विधानं करत केवळ व्ह्यूज मिळावेत म्हणून यावर व्हिडीओ पोस्ट केले. त्यात शिरीषच्या आजाराचं निदान लवकर का झालं नाही, कुटुंबियांनी त्याची काळजी का घेतली नाही अशा बऱ्याच टीका त्यांनी केल्या होत्या. त्यानंतर रेड साईल स्टोरीज पुन्हा सुरू करताना या टीकांना उत्तरं देताना पूजाने शिरीषच्या आजारपणाचे शेवटचे १५ दिवस नेमकं काय घडलं ते सांगितलं. मात्र, तो १५ दिवसांचा शिरीषचा प्रवास ऐकून तुम्हीदेखील थक्क व्हाल. कारण वर्षभराची लेक आणि बायको, बहीण कुटुंबीय यांच्यासाठी शिरीषचं असं अचानक जाणं हा एक धक्का होता हे या व्हिडीओमधून तीव्रतेने जाणवतं. शिरीषचा हा ट्यूमर बरा न होणारा म्हणजेच non-curable होता आणि या ट्यूमरची वाढ होऊन तो बळावेपर्यंत त्याची लक्षणं दिसत नाही असे पूजाने या व्हिडीओत सांगितले आहे.
केवळ ५ तासात हा व्हिडीओ ७० हजार फॉलोअर्सनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पूजाने ज्याप्रकारे धीर एकवटून शूट केला आहे, त्याबाबत सगळेच जण तिला पाठिंबा देऊन अशीच खंबीरपणे उभी रहा अशा कमेंट देत आहेत.