Sachin Tendulkar Tobacco Comment: दरवर्षी ३१ मेला जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन साजरा केला जातो. यानिमित्त काल मुंबईसह अनेक शहरांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले होते. अनेक ठिकाणी पथनाट्य, फ्लॅशमॉब करत, तंबाखू विरोधी घोषणा व पोस्टर्ससह मोर्चा काढून हा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त स्वतः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर एक पोस्ट शेअर केली होती. यातून समाज प्रबोधन करण्याचा भलेही सचिनचा हेतू असला तरी नेटकऱ्यांनी याचा संबंध थेट गावस्कर व सेहवाग यांच्याशी जोडून सचिन कसा या दोघांना सुनावतोय अशा चर्चा सुरु केल्या आहेत. काहींनी तर सचिन स्वतः खोटं बोलत असल्याचे म्हणत वेगळ्या बाजूने ट्रोलिंग केले आहे. चर्चेचा मुद्दा ठरलेली अशी कोणती पोस्ट सचिन तेंडुलकरने केली होती व त्यावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत हे पाहूया..

सचिन तेंडुलकरने ३१ मेला आपल्या X (पूर्व ट्विटर) अकाउंटवर पोस्ट लिहिली की, “माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीला, माझ्या वडिलांनी मला एक साधा पण महत्त्वाचा सल्ला दिला: तंबाखूला कधीही प्रोत्साहन देऊ नका. मी या सल्ल्याचे पालन करत जगलो आहे आणि तुम्हीही जगू शकता. उत्तम भविष्यासाठी तंबाखूपेक्षा आरोग्याची निवड करूया.”

दरम्यान, या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तंबाखूयुक्त गोष्टींचे सेवन करणाऱ्या अन्य खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये स्वतः सुनील गावस्कर व वीरेंद्र सेहवाग यांचेही फोटो जोडलेले आहेत. सचिन सर तुम्ही या दोघांना सुनावताय का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये विचारला आहे. तर एकाने कमेंट करून सचिनच्या जुन्या विधानाचा संदर्भ देत लिहिले की, “१९९६ च्या विश्वचषकाच्या वेळी सचिन एकमेव फलंदाज होता ज्याने त्याच्या बॅटवर ‘फोर स्क्वेअर’ किंवा ‘विल्स’ चे स्टिकर लावले नव्हते. त्याला तंबाखूच्या ब्रँडचे समर्थन किंवा जाहिरात करायची नव्हती, म्हणूनच आज देश सचिनकडे ‘हिरो’ म्हणून पाहतो.”

हे ही वाचा<< सचिन तेंडुलकरच्या लेकासाठी MI ने किती लाखांची बोली लावली होती? त्याआधी अर्जुन तेंडुलकर काय करत होता, पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे यावर ‘विराट कोहली का फॅन’ या अकाऊंटवरून केलेली कमेंट मात्र चांगलीच चर्चेत आली आहे. या युजरने लिहिले की, “हा माणूस (सचिन तेंडुलकर) शुद्ध खोटारडा आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेकदा तंबाखूचा प्रचार केला आहे. अगदी १९९८ मध्ये शारजाह येथे याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा ‘धुव्वा’ उडवला होता.” ही कमेंट वाचून तुमच्या लक्षात आले असेलच की चाहत्याने उपहासात अशी कमेंट केली होती पण सुरुवात वाचून अनेकांनी आपल्याला धक्का बसल्याचे कमेंटखाली लिहिले आहे.