शाळा ही मुलांसाठी अभ्यासाची आणि खेळण्या-बागडण्याची जागा आहे. त्यात आजकाल अनेक शाळांमध्ये अभ्यासासह अनेक उपक्रमही राबवले जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना तणावपूर्ण वातावरणात शिकता येईल अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात; ज्या आपल्या शालेय वयात फार कमी वेळा शिकलो असू. पण, अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या नावाखाली आजकाल शाळा विविध शुल्क आकारत आहेत. पण, परदेशात एक शाळा शालेय उपक्रमांव्यतिरिक्त झोपण्याचीही सुविधा देऊन, त्यासाठी शुल्कही आकारत आहे. यात डबा खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची मस्त झोपण्याचीही सोय केली जाते. त्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना ओरडत नाहीत; उलट झोपण्यासाठी चादर-उशी आणून देतात. त्यामुळे ही शाळा नेमकी कुठे आहे आणि हा उपक्रम नेमका काय आहे ते जाणून घेऊ.
‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, चीनमधील एका शाळेत विद्यार्थ्यांकडून शिकवण्यासाठी नाही तर झोपण्यासाठी फी वसूल केली जाते. या शाळेची ही अजब फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ही शाळा चीनच्या दक्षिण-पूर्व प्रांत गुआंगडोंगमध्ये आहे. पण, पालक शाळेच्या या अजब उपक्रमामुळे हैराण झाले आहेत.
शाळेत दुपारी झोपण्यासाठी द्यावी लागते फी
गुआंगडोंग प्रांतातील जिशेंद प्राथमिक शाळेत हा अजब उपक्रम राबवला जात आहे. त्यात प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकडून दुपारी झोपण्यासाठी फी आकारली जात आहे. त्यामुळे चिनी सोशल मीडियावर या शाळेच्या शिक्षक आणि पालकांच्या ग्रुपमधील एक चॅट व्हायरल होत आहे; ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांवर दुपारच्या झोपेसाठी अतिरिक्त शुल्क लादले जात आहे.
या उपक्रमानुसार, विद्यार्थ्यांना शाळेत काही वेळ झोपता येते. त्यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या देखरेखीखाली असतात. या कालावधीत जर त्यांना न झोपता घरी जायचे असेल तरीही शाळा त्यांच्याकडून शुल्क आकारत आहे.
शिक्षक करून देतात उशी, चटई चादरी अन् प्रायव्हेट रूमची व्यवस्था
या ब्रेकमध्ये जर मूल त्याच्या डेस्कवर डोके टेकवून झोपले असेल, तर त्याला २०० युआन म्हणजेच २,३०० रुपये द्यावे लागणार आहेत. जर त्याला वर्गातच चटई टाकून आरामात झोपायचे असेल, तर त्याला ३६० युआन म्हणजेच सुमारे ४,५०० रुपये द्यावे लागतात. जर त्याला झोपण्यासाठी बेडसहित एक प्रायव्हेट रूम पाहिजे असेल, तर त्यासाठी त्याला ६८० युआन म्हणजेच सुमारे ७,८०० रुपये शुल्क द्यावे लागते.