जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाच्या संकटामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. करोनाच्या साथीमुळे अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. युरोपमधील इटली, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीसारख्या देशांच्या आर्थव्यवस्थेचे गणित करोनामुळे बिघडले आहेत. यापैकी अनेक देशांनी आता हळूहळू लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करत अर्थचक्राला गती देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच फ्रान्समधील एक बड्या कंपनीच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्याने (सीईओ) जगविख्यात चित्रकार लिओनादरे दा विंची याने काढलेलं मोनालिसाचं चित्र फ्रान्सने विकावं असा सल्ला दिला आहे. मोनालिसाचं चित्र चार लाख कोटींना विकून तो पैसा करोनामुळे बिघडलेलं फ्रान्सचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी वापरावा असा सल्ला या सीईओने दिला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द इंडिपेटंड’ या वृत्तपत्राने दिलं आहे.
फ्रान्समधील फॅबरनोव्हेल या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे संस्थापक आणि सीईओ असणाऱ्या स्टीफान डिस्टिंग्विन यांनी उसबेक अॅण्ड रिका या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोनालिसाचं चित्र विकण्यासंदर्भात वक्तव्य केलं. “ज्याप्रमाणे लहान मुलं विहीर किती खोल आहे हे पाहण्यासाठी दगड टाकून अंदाज व्यक्त करतात त्याच प्रमाणे आपण या संकटाला तोंड देण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च केले आहेत. त्यानंतर आजही आपण हे संकट किती मोठं आहे याबद्दल अंदाजच व्यक्त करत आहोत. हे संकट खरोखरच अनाकलनिय आहे,” असं मत स्टीफान यांनी व्यक्त केलं.
आर्थिक संकटाच्या काळात ज्याप्रमाणे एखादे कुटुंब दागिने विकते त्याचप्रमाणे आपल्याला मोनालिसाच्या चित्राचा विचार करता येईल असं मत स्टीफान यांनी व्यक्त केलं. “चित्र हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे सहज शक्य असतं आणि इतरांच्या ताब्यात देणंही तुलनेने सहज सोपे आहे. आपल्याकडे अनेक चित्र आहेत. २०२० साली आपल्याला जिथून पैसा उभारता येणं शक्य आहे तिथून उभारायला हवा. आपण आपला दागिना विकयला हवा. या प्रकरणामध्ये किंमत हा गुंतागुंतीचा आणि वादाचा विषय ठरु शकतो. या विक्रीचा हेतू साध्य होण्यासाठी किंमत मोठीच ठेवावी लागणार. माझ्या मते मोनालिसासारख्या कलाकृतीसाठी ५० बिलियन युरोपेक्षा (चार लाख कोटी रुपये) जास्तच किंमत मोजली जाईल. मी सांगितलेली किंमत खूपच जास्त आहे आणि विश्वास बसण्यासारखी नाहीय असं मला अनेकांनी सांगितलं आहे. मात्र याबद्दल योग्य मुद्दे मांडून माझ्याशी कोणीच अद्याप चर्चा केलेली नाही,” असं स्टीफान म्हणाले.
एक उद्योजक आणि करदाता म्हणून हे अब्जावधी रुपये असेच मिळणार नाही याची मला जाणीव आहे. यासाठी आपल्याला किंमत मोजावी लागेल. आपल्याकडे असणाऱ्या मौल्यवान वस्तू अधिक किंमतीला विकणे ही गरज आहे. मात्र या विक्रीमधून भविष्यात आपल्याला कमी फटका बसेल याचा विचार करावा लागेल असंही स्टीफान यांनी सांगितलं.
मोनालिसाच्या चित्राला ठराविक काळासाठी वेगवेगळ्या देशांकडे स्वाधिन करुन त्या माध्यमातून निधी उभा करण्याचा प्रयत्न करता येईल असंही स्टीफान यांनी म्हटलं आहे. ठराविक काळानंतर वेगवेगळ्या देशांकडे या चित्राची मालकी दिल्यास चित्राची मूळ मालकी फ्रान्सकडेचे राहून या माध्यमातून पैसे मिळवता येतील असं स्टीफान म्हणाले. “तांत्रिक आणि कायदेशीर दृष्ट्या या गोष्टीचे अनेक फायदे आहेत. यामुळे फ्रान्सची चित्रावरील मालकी कायम राहिल. या माध्यमातून जगविख्यात चित्रकार लिओनादरे दा विंचीची ख्याती आणि कार्य जगभरात पोहचेल,” असंही स्टीफान या योजनेबद्दल बोलताना म्हणाले.