Alligator Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरीचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मगरीला अनेक प्राणी घाबरतात. पण ही मगरी मानवी वस्तीत आली तर… सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतंय.
एका धक्कादायक घटनेत, फेअरफॅक्स काउंटी पोलीसांना व्हर्जिनियामधील फेअरफॅक्स काउंटीतील एका मोटेलच्या बाहेर ६ फूट लांबीची जंगली मगर फिरताना दिसली. सार्वजनिक ठिकाणी अशा धोकादायक प्राण्याचे भयानक दृश्य पाहून स्थानिक नागरिकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ या मगर असल्याचे निश्चित केले.
फेअरफॅक्स काउंटी पोलिसांनी या विचित्र घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मगर मोटेलच्या रूमबाहेर आणि लॉबीजवळ फिरताना दिसते. हा व्हिडिओ शूट करत असलेल्या एका पोलिस आश्चर्याने म्हणताना ऐकू येते, “अरे बापरे! ही तर मगर आहे! खरंच हॉटेलच्या बाहेर एक मगर आहे.” मगर किती मोठी आहे हे पाहताना तो पोलिस म्हणतो, “जर मी तिच्या शेजारी झोपलो, तर ही मगर जवळपास ६ फूट लांब असेल.” या घटनेने तिथल्या स्थानिक लोकांचे आणि मोटेलमधील पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.
मगरीचा व्हिडीओ व्हायरल
द न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, ही मगर तिच्या मालकाकडून एका विश्रांतीस्थळी थांबलेल्या वेळी वाहतूक करताना पळून गेली. ही मगर न्यूयॉर्कहून नॉर्थ कॅरोलिनामधील एका प्राणीसंग्रहालयात नेली जात होती. दरम्यान, मालकाचे थोड्यावेळ लक्ष विचलित झाल्याने ही भितीदायक घटना घडली आणि मगर थेट व्हर्जिनियाच्या मोटेलच्या दरवाजापर्यंत पोहोचली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला @FairfaxCountyPD या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला ६४ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मालकाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, कारण व्हर्जिनिया राज्याच्या कायद्यानुसार कोणत्याही दुर्मिळ सर्पप्राण्याला पळून जाऊ देणे किंवा जाणीवपूर्वक मोकळे फिरू देण्याची परवानगी नाही.
अहवालानुसार या घटनेत कुणालाही इजा झाली नाही आणि ही मगर पुन्हा तिच्या मालकाकडे परत देण्यात आली आहे.