Lion Cage Attack Video: जंगलात सिंह दिसला तर प्रत्येकाच्या छातीत धडकी भरते, पण पिंजऱ्यात बंदिस्त सिंह पाहून काहीजण इतके बेफिकीर होतात की त्याच्यासोबत मस्ती करण्याची हिम्मतही दाखवतात. पण पिंजरा हा केवळ लोखंडाचा साचाच असतो. सिंहाच्या हल्लेखोर वृत्तीवर त्याचं नियंत्रण राहतंच असं नाही. असाच एक हादरवून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे, ज्यात एका व्यक्तीने पिंजऱ्यात असलेल्या सिंहासोबत मस्ती करताना स्वतःचा जीव धोक्यात घातला…आणि नंतर जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद झालेल्या या भयानक क्षणांनी नेटिझन्सना हादरवून सोडलं आहे.
सध्या सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने सिंहाच्या पिंजऱ्यात हात घातल्यामुळे त्याच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती. काही सेकंदांचा हा व्हिडीओ इतका भितीदायक आहे की कमकुवत हृदयाच्या लोकांनी पाहताना काळजी घ्यावी लागेल. कारण या व्यक्तीच्या मूर्खपणाची किंमत काय असते, हे या व्हिडीओतून स्पष्ट दिसून येते.
व्हिडीओमध्ये दिसतं की, दोन व्यक्ती सिंहाच्या पिंजऱ्याजवळ उभे आहेत आणि त्यांचं निरीक्षण करत आहेत. त्यातील एक जण इतका पुढे जातो की सिंहाच्या पाठीवरून हात फिरवायला लागतो, तर दुसरा थेट सिंहाच्या डोक्यावर हात फिरवतो. पुढच्या क्षणी सिंह अचानक भडकतो आणि सरळ त्या व्यक्तीचा हात जबड्यात पकडतो.
सिंहाची पकड एवढी जबरदस्त असते की तो हात एकदम घट्ट दाबतो. काही क्षण तर वाटतं की हात सुटणारच नाही, पण नशिबाने सिंहाची पकड सैल झाली आणि त्या व्यक्तीचा जीव वाचला. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांच्या अंगावर काटा आला असून, सर्वत्र यावर चर्चा सुरू झाली आहे.
ही घटना २०१७ सालातील असून दक्षिण आफ्रिकेतील ब्लोमफोंटेन येथील वेल्टेव्रेडेन गेम लॉजमध्ये घडली होती. स्कॉट बाल्डविन नावाचा हा व्यक्ती प्रसिद्ध रग्बी खेळाडू आहे. या घटनेनंतर त्याने स्वतःच्या वागणुकीबद्दल चाहत्यांची माफी मागितली होती. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मिडियावर पुन्हा व्हायरल होतोय.
येथे पाहा व्हिडीओ
व्हिडीओ शेअर करणाऱ्या इन्स्टाग्राम युजरने लिहिलं, “सिंहासारख्या हिंस्र प्राण्यांशी मूर्खपणा केल्यास परिणाम काय होतो, हे इथे स्पष्ट दिसतं.” काही सेकंदांच्या या व्हिडीओने लोकांचा श्वास रोखून धरला. एकाने म्हटलं, “सिंह आहे तो, कुत्रा नाहीय की गोंजारायला जाल,” तर दुसऱ्याने लिहिलं, “अशा माणसांनी जंगलातच जाणं टाळावं.”
सिंहाशी खेळणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. हा व्हिडीओ एक धडा आहे. कारण एक चूक आणि आयुष्यभराची किंमत मोजावी लागू शकते.