School Boy Threatens Teacher Funny Video : लहान मुलं अभ्यास न करण्यासाठी काही ना काही बहाणाच शोधतच असतात. अभ्यास करताना कधी त्यांचा हातच दुखतो, कधी पोटात दुखतं, तर कधी ती काय आणखी बहाणा सांगतील याचा काही नेम नाही. काही वेळा तर धमकी द्यायलाही ती मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तो थेट शिक्षकालाच भरवर्गात धमकी देताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. अनेकांनी चिमुकल्याला बॉलीवूड चित्रपटातील खलनायक वाटत असल्याचे म्हटलेय.

चिमुकल्याने थेट शिक्षकाला दिली धमकी

हा व्हिडीओ एका शाळेच्या वर्गातील आहे, जिथे एक लहान मुलगा त्याच्या शिक्षिकेसमोर बसलेला आहे. यावेळी तो अगदी निरागस चेहरा करत रडतोय. पण, रडत रडत तो जे काही बोलतो, ते अगदी बॉलीवूड चित्रपटातील खलनायकाला लाजवेल, असं आहे.

कारण- तो चिमुकला विद्यार्थी रडत रडत आपल्या शिक्षिकेला भरवर्गात धमकावताना दिसतो. माझे पप्पा पोलीस आहेत. मला होमवर्क देऊ नका, नाही तर ते गोळी मारतील, अशी थेट धमकीच त्याने शिक्षिकेला दिली. त्यावरच तो थांबत नाही. तर पुढे तो म्हणतो, “घरी एका ट्रंकेमध्ये बंदूक ठेवली आहे, मी तुम्हाला सांगतोय.” शिक्षिका सुरुवातीला त्याचे हे शब्द ऐकून स्तब्ध होते; पण नंतर मुलाच्या त्या गोंडस धमकीवर जोरजोरात हसू लागते. शिक्षिकेने होमवर्क करायला दिल्याने तो चिमुकला रागावतो आणि शिक्षिकेशी अशा प्रकारे बोलू लागतो.

हा व्हायरल व्हिडीओ @jpsin1 नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, तो काही वेळातच लाखो लोकांनी पाहिला. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज, लाइक्स व कमेंट्स आल्या आहेत. अनेक युजर्स या मुलाला ‘लिटील डॉन’, ‘फ्युचर गँगस्टर’ व अगदी ‘क्राईम पेट्रोल ऑफ द क्लासरूम’ असे म्हणत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने विनोदाने लिहिले, “हा फक्त एक मुलगा नाही, तो त्याच्या बालपणातच ‘डॉन को पकडना मुश्किल ही नही, नामुमकिन है’ अशी वाइब देत आहे.” दुसऱ्याने लिहिले, “शिक्षकाला गोळी मारण्याची धमकी देऊनही आपण पास होऊ शकतो, असा आत्मविश्वास फक्त या मुलातच असू शकतो.” काही लोक मुलाच्या निरागसतेने प्रभावित झाले, तर काहींनी विनोदात म्हटले की, त्याला आत्ताच चित्रपटांमध्ये साइन करायला हवे.