Snake Shocking Viral Video : यंदा मे महिन्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेक प्राणी मानवी वस्तीत शिरताना दिसतायत. यात विशेषत: साप हा प्राणी बिळातून बाहेर येत शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी जी उबदार जागा मिळेल तिथे आसरा शोधतात. यात जंगलतोड करून नागरी वस्तींचे प्रमाण वाढत असल्याने अनेकांच्या घरातदेखील साप दिसतात. दरम्यान, नागपूरमधून अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही बेडवर झोपण्याआधी केवळ उशीच नाही तर सर्व अंथरुण तपासूनच झोपाल.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील पंकज कुवरे यांच्या घरातून ही घटना समोर आली आहे. त्यांच्या घरातील एक सदस्य सर्व काम आटोपून रात्री झोपण्यासाठी खोलीत गेली, यावेळी बेडवर झोपताच त्यांना उशीखाली काहीतरी हालचाल होत असल्याचे जाणवले, यावेळी त्यांनी जेव्हा उशी उचलली तेव्हा त्यांची झोप तर उडालीच, पण पायाखालची जमीनही सरकली. कारण त्यांच्या उशीच्याखाली एक विषारी साप दडून बसला होता. त्यांनी उशी उलटी करून बाजूला केली तेव्हा एक साप रेंगाळत बाहेर पडताना दिसला, हे दृश्य पाहून त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. पण, प्रसंगावधान राखत पंकज कुवरे यांनी सर्प मित्राशी संपर्क करून त्याला बोलावले.

अखेर सर्पमित्र आला आणि त्याने दुसऱ्या उशीखाली जाऊन लपलेल्या सापाला पकडले आणि प्लास्टिकच्या बरणीत ठेवले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे कुवरे कुटुंबासह आजूबाजूच्या लोकांमध्येही आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हा साप बेडजवळील खिडकीतून घरात शिरल्याचे सांगितले जात आहे.

Snake Shocking Viral Video
सापाचा भयानक व्हिडीओ

नागपूरच्या शहरी भागात साप दिसण्याच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात या घटनांमुळे रहिवाशांना सतर्क राहण्याचे, नियमितपणे त्यांच्या अंथरुण आणि बेडची तपासणी करण्याचे आणि साप दिसल्यास स्थानिक सर्पमित्रांशी (सर्पमित्र) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.