सोशल मीडिया हे माध्यम सध्या ट्रोलिंग करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून वापरणाऱ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. खास करुन एखादी कंपनी किंवा ब्रॅण्ड किंवा व्यक्तींना ट्रोल करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. अगदी चित्रपट असो, क्रिकेटचा सामना असो किंवा एखादी जाहीरात असो सेलिब्रिटी हे सध्या ट्रोलर्ससाठी सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. मात्र अनेकदा हे ट्रोलर्स मर्यादेचं उल्लंघन करुन सेलिब्रिटींना लक्ष्य करताना दिसतात. पण बॉलिवूडमध्ये अण्णा नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेता सुनील शेट्टीला तर त्याने न केलेल्या जाहिरातीवरुन ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. पण या ट्रोलरला सुनील शेट्टीने अगदी जशास तसं उत्तर दिल्याचं पहायला मिळालं.

झालं असं की ट्विटरवरील एका इन्फ्लूएन्सरने हायवेच्या बाजूला होर्डिंगवर लावण्यात आलेल्या पान मसाल्याच्या जाहिरातींबद्दल एक उपहासात्मक वक्तव्य करणारी पोस्ट केली. या हायवेवर पान मसाल्याच्या एवढ्या जाहिराती पाहिल्यात की आता गुटखा खाण्याची इच्छा झालीय, असं म्हणत एकाने हायवेवरील गुटख्याच्या होर्डिंगचा फोटो शेअर केला होता. त्यावर मोनी कृष्णन् नावाच्या व्यक्तीने प्रतिक्रिया देताना जाहिरातीमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्यांवर निशाणा साधला.

मोनी नावाच्या या युझरने आपल्या ट्विटमध्ये, “शाहरुख खान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी तुम्ही देशाचे गुटखा किंग आहात. तुम्ही देशाला चुकीच्या दिशेने घेऊन चाललाय यासाठी तुमच्या मुलांना तुमची लाज वाटत असेल. देशाला कॅन्सरचा देश या वाटेला नेवू नका वेड्यांनो,” असं म्हटलं होतं. या ट्विटमध्ये त्याने शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीला टॅग केलेलं. विशेष म्हणजे या जाहिरातीमध्ये काम करणाऱ्या अव्वल कलाकारांमध्ये सुनील शेट्टीचा सामवेश नसून जाहिरातीत आधीपासून अजय देवगण काम करतोय. या होर्डिंगवरही अजय देवगण, अक्षय कुमार आणि शाहरुख खान दिसत आहेत.

थेट सुनील शेट्टीला टॅग करुन ट्विट करण्यात आल्यामुळे त्यानेही ट्विटरवरुन भन्नाट पद्धतीने या ट्विटला रिप्लाय दिला. “भावा तू तुझा चष्मा नीट लाव किंवा बदलून घे,” असा टोला सुनील शेट्टीने या ट्विटला रिप्लाय करताना लगावला. हे ट्विट तुफान व्हायरल झालंय.

या ट्विटनंतर मोनीला आपली चूक लक्षात आली आणि त्याने स्पष्टीकरण दिलं. या स्पष्टीकरणावर सुनील शेट्टीने हात जोडण्याचा इमोन्जी पोस्ट करत रिप्लाय दिलाय. “हॅलो, सुनील शेट्टी सॉरी. चुकून तुम्हाला टॅग केला. तुम्हाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. तो टॅग अजय देवगण असा हवा होता. मी तुमचा चाहता आहे त्यामुळे नेहमी टॅग करताना तुमचं नाव आधी दिसतं,” असा रिप्लाय मोनीने दिलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या चर्चेत असणाऱ्या या पान मसाल्याच्या जाहिरातीवर टीका करताना एका व्यक्तीने केलेल्या या चुकीमुळे आणि त्याला थेट सुनील शेट्टीने रिप्लाय केल्याने नेटकऱ्यांचं चांगलं मनोरंजन झाल्याचं पहायला मिळालं.