सरकारी शाळांची दुरावस्था कोणापासूनही लपून राहिलेली नाही. शाळेच्या इमारतीपासून ते वीज, पाणी अशा सर्व सुविधा फक्त नावालाच आहेत. अशा वाईट परिस्थितीतही अनेक गरीब विद्यार्थी शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. पण, भरमसाठ पगार घेणारे काही शिक्षक शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून नको ती कामं करून घेत आहेत. सध्या अशाच एका शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तिने एका विद्यार्थ्याला हवा घालण्याची ड्युटी दिली आहे. त्यामुळे ही नेमकी शिक्षिका आहे की महाराणी असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. शिक्षिकेच्या अशा वागण्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
शाळेत विद्यार्थी शिकण्यासाठी जातात, यावेळी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिस्त शिकवली जाते. मात्र, काही शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्त शिकवणं दूरच, स्वत:च बेशिस्त असल्याप्रमाणे वागत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शिक्षिका शाळेच्या मैदानात फुलांनी सजावट करताना दिसत आहे, यावेळी तिच्या मागे एक विद्यार्थी तिला पंख्याने हवा घालत आहे. मैदानात १५ ऑगस्टची तयारी केली जात होती, असे दिसत आहे. ही शिक्षिका ज्या ठिकाणी जातेय, तिथे हा विद्यार्थी हातात पंखा घेऊन तिला हवा घालतोय; तर बाकीचे विद्यार्थी मैदानात इथे-तिथे फिरत आहेत. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या हापूरमधील सरकारी शाळेतील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पण, शिक्षिकेने एखाद्या विद्यार्थ्याकडून अशाप्रकारची कामं करून घेणं अजिबात शोभणारे नाही.
हा व्हिडीओ (@priyarajputlive) नावाच्या ट्विटर अकाउंटवरून १९ ऑगस्ट रोजी पोस्ट करण्यात आला, जो आता तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी लाईक केला आहे. याशिवाय बहुतांश युजर्स त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, …म्हणूनच प्रत्येकाला सरकारी शिक्षक व्हायचे आहे. पूर्वी सरकारी शिक्षक खूप छान शिकवायचे, पण आता लोक या व्यवसायाला घरात बसून दर महिन्याला भरघोस कमाईचे साधन मानतात; तर दुसऱ्या युजरने लिहिले की, हे खूप आहे, हे खूप अति झालं यार. कोणी काहीही म्हणो, पण शिक्षकांचा मुलांबद्दलचा असा दृष्टिकोन अत्यंत चुकीचा आहे. पण, या विषयावर तुमचे मत काय आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.