Rajasthan State Open School Exam Cheating Scandal Video : तहान लागल्यावर विहीर खोदणे अशा आशयाचा वाक्प्रचार सर्वश्रुत आहे. त्यानुसार परीक्षा डोक्यावर आली की, मुलं अभ्यासाला सुरुवात करतात. मुलांनी वर्षभर केलेला अभ्यास त्यांना कितपत समजला हे पाहण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये विद्यार्थी चांगली कामगिरी करू शकले तर त्यावरून शिक्षकांनी शिकवलेला अभ्यास त्यांना व्यवस्थित समजला, असं मानलं जातं. त्यात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सर्वांत महत्त्वाच्या परीक्षा म्हणजे दहावी व बारावीच्या परीक्षा. त्या आधारावर विद्यार्थ्यांना आपला पुढील शैक्षणिक प्रवास ठरवता येतो. प,ण जोधपूरच्या फलोदीमध्ये एका शाळेत दहावीच्या खुल्या बोर्डच्या परीक्षेदरम्यान दिसलेले दृश्य खूपच धक्कादायी आहे. सध्या या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

परीक्षेदरम्यान सुरू होता सर्रास कॉपीचे प्रकार

सर्वसाधारणपणे आपण पाहतो की, परीक्षेत एकाही विद्यार्थ्याने कॉपी करू नये, याची काळजी शिक्षक घेत असतात. पण, जोधपूरच्या फलोदी जिल्ह्यातील देचू तालुक्यातील कोलू राठोड गावातल्या पणजी का बेरा सरकारी शाळेत चक्क शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करण्यात मदत करीत असल्याचे पाहायला मिळाले. दहावीच्या खुल्या परीक्षेसाठी येथे केंद्र सुरू करण्यात आले होते. संपर्क पोर्टलवर या केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकार होत असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर तत्काळ भरारी पथकाची एक तुकडी तेथे पोहोचली. यावेळी परीक्षा सुरू असलेल्या वर्गात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात कॉपी करीत असल्याचे त्यांना दिसले. हे दृश्य पाहून भरारी पथकाची तुकडीही आश्चर्यचकित झाले. त्यांनी शाळेच्या तीन खोल्यांमध्ये एकत्रितपणे कॉपी करणाऱ्या मुलांना पकडले.

अशा प्रकारे केली जात होती कॉपी

शाळेत खुल्या बोर्डाच्या १२ वीच्या भौतिकशास्त्र आणि दहावीच्या गणित विषयाच्या परीक्षा सुरू होत्या. या परीक्षेदरम्यान भरारी पथकाला परीक्षेत डमी उमेदवार म्हणून बसलेले अनेक जण सापडले. इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांनी खुलेआमपणे परीक्षेत कॉपी करू देण्यात शिक्षकांचाही सहभाग होता. ते विद्यार्थ्यांना कॉपी करण्यामध्ये पुरेपूर साथ देत होते. धक्कादायक प्रकार म्हणजे एक शिक्षक परीक्षा सुरू असतानाच चक्क समोरच्या फळ्यांवर प्रश्नांची उत्तरे लिहीत होता; जे पाहून विद्यार्थी कॉपी करत होते. यावेळी भरारी पथकाला पाहताच अनेक विद्यार्थ्यांनी तेथून पळ काढला. भरारी पथकाच्या तुकडीने तपास केला असता, वर्गातील फळ्याच्या मागे पुस्तके आणि दोन मोबाईल सापडले. त्याशिवाय वर्गात जेवढे विद्यार्थी होते, त्यापेक्षा २५ जास्त कॉपी आढळून आल्या. या सामूहिक कॉपीप्रकरणी तपास पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु, अशा प्रकारे परीक्षेत कॉपी करणे दखलपात्र गुन्हा आहे. तरीही विद्यार्थी ते दुष्कृत्य करण्याचे धाडस करतात. अनेक विद्यार्थी परीक्षा जवळ आल्यावर अतिशय कमी कालावधीत अभ्यास उरकण्याचा प्रयत्न करतात आणि मग तो न झाल्याने त्यांना नापास होण्याची भीती वाटू लागते. अशा वेळी हे विद्यार्थी कॉपी करण्याचा तुघलकी मार्ग शोधून काढतात.