Woman Drives Car On Railway Track Video Viral : रेल्वे रुळ ओलांडू नका अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र, अनेक जण जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडताना दिसतात. अशावेळी अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. काहीवेळा लोक स्टंटबाजी म्हणून रेल्वे रुळांवर वाहन घेऊन जाताना दिसतात. अशाचप्रकारची एक धक्कादायक घटना तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातून समोर आली आहे, ज्यात एका ३४ वर्षीय महिलेने दारुच्या नशेत आपली कार थेट रेल्वे रुळांवरून चालवत नेली, ज्यामुळे रेल्वे कर्मचारी आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना बुधवारी (२५ जून २०२५) घडली, या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

महिलेच्या या धक्कादायक प्रकारामुळे तब्बल १५ रेल्वेगाड्यांचे मार्ग तातडीने वळवण्यात आले, यानंतर महिलेला अटक करण्यात आली. ही महिला अचानक आपली कार रेल्वे रुळांवर घेऊन गेली आणि रुळांवरून ती बरेच अंतर कार पळवत राहिली. यावेळी तिला रेल्वे कर्मचारी आणि लोकांनीही ओरडून ओरडून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती कार सुसाट वेगात पळवू लागली.

महिलेच्या या कारनाम्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील पहिल्या व्हिडीओत ती महिला रेल्वे रुळावर Kia Sonet ही कार सुसाट वेगात पळवताना दिसतेय, तर दुसऱ्या व्हिडीओत स्थानिक नागरिक आणि रेल्वे कर्मचारी, पोलिस त्या महिलेला रोखण्याचा प्रयत्न करतायत, पण ती कोणाचेही न ऐकता कार सुसाट पळवतेय. दरम्यान, व्हायरल तिसऱ्या व्हिडीओत संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे दिसतेय पण ती सुटकेसाठी ओरडतेय.

या प्रकारामुळे काही काळासाठी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली, ज्यामुळे बंगळुरू-हैदराबाद एक्स्प्रेससह किमान १० ते १५ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, पण रेल्वेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. पोलिसांना संशय आहे की, या मद्यधूंद अवस्थेतील महिलेने रीलसाठी हा सर्व जीवघेणा प्रकार केला असावा. पण, या घटनेमुळे आता रेल्वे ट्रॅकवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.