Shocking Accident Video: हिमालयाच्या कुशीतून एका शांत रस्त्यावरून चालत असलेली कार अचानक प्रचंड धक्कादायक संकटाच्या छायेत अडकते. एक मोठा दगड पडत पडत थेट त्या कारसमोर येऊन आदळतो आणि क्षणात वातावरणात थरकाप निर्माण होतो. घटनेसाठी लागली केवळ काही सेकंदे; पण वाचणाऱ्यांच्या अंगावर काटा आणेल असा हा प्रसंग. कल्पना करा की, आपण चालत्या कारमध्ये आहात आणि डोंगरावरून एक मोठा खडक खाली येतोय… थांबवता येईल का तो? वाचाल का तुम्ही त्यातून? घटनेच्या नुसत्या कल्पनेनेच मनावर केवढा ताण येतो… प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्याच्या काळजाचं काय झालं असेल…?
किन्नौरच्या नाथपा पॉइंटवरील हा थरारक प्रसंग केवळ एका दुर्घटनेपुरता मर्यादित नाही, तर आपल्याला निसर्गाचे भयानक रुपही दाखवतो. जीव गमावला जाईल किंवा एका क्षणानं तो वाचू शकेल, हेच या व्हिडीओचं भयकारक वास्तव आहे.
किन्नौर जिल्ह्यात घडलेली ही घटना ऐकून अंगावर काटा येईल. नाथपा पॉइंट परिसरात नेहमीसारखं वातावरण शांत होतं. काही वाहनं रस्त्यानं जात होती. आणि त्याच क्षणी डोंगरावरून अचानक एक भलामोठा दगड धडाधड खाली घसरू लागला. काही क्षणांतच तो वेगानं खाली येत कारच्या दिशेनं आला आणि थेट कारच्या समोरच्या भागावर जोरात आदळला.
त्या भीषण धडकेत क्षणार्धात कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला, काचांचे तुकडे चारही बाजूंनी उडाले. काही सेकंदात सगळं शांत झालं… पण ड्रायव्हरचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता. सुदैवानं कारमधील लोक बचावले; मात्र त्या क्षणाचा डॅशकॅम व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोकांच्या अंगावर काटा येतोय.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ‘चालत्या कारवर मृत्यूचा हल्ला’ या शीर्षकाखाली वेगाने व्हायरल होत आहे. हजारो लोकांनी तो पाहिला असून, “देवा, एवढ्या जवळून मृत्यू गेला!” अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
पण, ही काही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात प्रचंड भूस्खलनामुळे एक मोठी बस ढिगाऱ्यात गाडली गेली होती. झंडुता उपविभागातील बालूघाट भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत तब्बल १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. बचाव पथकांना बसचं छप्पर क्रेनद्वारे बाजूला काढून प्रवाशांना बाहेर काढावं लागलं होतं.
किन्नौर जिल्ह्यातले डोंगर सध्या सतत खचत आहेत. चौरा परिसरातील भूस्खलनामुळे एनएच-५ हा महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. या दुर्घटनेचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
येथे पाहा व्हिडीओ
हिमालयाच्या या दुर्गम भागात प्रत्येक पावसाळ्यात अशी संकटं वारंवार कोसळत असतात. आता या व्हिडीओमध्ये कैद झालेला प्रसंग तर ‘मृत्यू समोरून धावत आला; पण सेकंदभराच्या फरकाने वाचले प्राण’ अशा भयावह स्थितीने लोकांना हादरवून सोडतोय.