रस्ता मोकळा असला की गाडी चालवायला किती मज्जा येते. पण वाहतूक कोंडीत एकदा का अडकलो की जाम वैताग येतो. बरं ही कोंडी लवकर सुटली तर ठिक नाहीतर तासनतास अडकून बसल्याशिवाय गत्यंतर नसते. आपल्या इकडचे काही लोक तर या कोंडीत एक मिनिटभरही शांत बसणार नाही. सतत हॉर्न वाजवून लोकांना हैराण करत बसतील, एकमेकांना शिव्या देतील, काही तर राडे वगैरेही करतील. आता आपल्या हॉर्न वाजवण्याने वाहतुकीची कोंडी सुटणार थोडीच. पण हे समजण्याइतका सुज्ञपणा आपल्याकडे काही नसतो. आता वाहतूक कोंडीत अडकल्यावर वेगळं काय करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या महिलेला पाहा.

वाहतूक कोंडीत अडकल्यावर काय करावे याचे अजब उदाहरण तिने लोकांना दिले आहे. तासन तास रस्त्यावरची कोंडी सुटत नाही म्हटल्यावर तिने आपली योगा मॅट गाडीतून बाहेर काढली आणि चक्क योगासनं करायला सुरूवात केला. ‘ट्रॅफिक जाऊ दे खड्ड्यात मी बाबा आपली योगासनं करते’ असं म्हणत तिने भररस्त्यात योगासनं सुरू केली. आता वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही, तेव्हा आपल्या हातात जे काही आहे ते करून पाहूयात अस तिचं म्हणणं पडलं. आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

हे योगापर्यंत ठिक आहे. काही दिवसांपूर्वी तर चीनच्या रस्त्यावर याहूनही कहर पाहायला मिळाला होता. आता चीनमधली वाहतूक कोंडी फारच भयंकर हे वेगळं सांगायला नको. काही महिन्यांपूर्वी तर इथल्या रस्त्यावर दर दिवसाआडून एवढी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती की गाड्या दिवसभर या कोंडीत अडकून पडल्या होत्या. तेव्हा इथल्या महिलांनी एकत्र येऊन रस्त्याच्या कडेला सामूहिक नृत्यच करायला सुरूवात केली होती आणि इतर लोकांनाही त्याला चांगलीच साथ दिली होती.