Man Swept Away In Flood Water : गेल्या २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे गोव्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी आयएमडीने राज्यभर रेड अलर्ट जारी केला होता. पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे आणि प्रवाशांना अडचणी येत आहेत. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील काही भागात वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान गोव्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती स्कूटरसह वाहून गेल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.

एक्स (पुर्वीच्या ट्विटर) वर Priyathosh Agnihamsa @priyathosh6447 नावाच्या खात्यावरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, मुसळधार पाऊस सुरू आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून रस्त्यावरून जोरात पाणी वाहत आहे. काही कार आणि दुचाकी पाण्यात अडकल्याचे दिसत आहे. दरम्यान एक व्यक्ती रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अडकल्याचे दिसून येते. पाण्याचा प्रवाह इतका जोरात की ती व्यक्ती प्रवाहाबरोबर वाहून गेल्याचे दिसत आहे. तिथे उपस्थित लोक त्या व्यक्तीला स्कूटर सोडण्यास असे सांगतात पण ती व्यक्ती ऐकत नाही. पुराच्या पाण्यात तो व्यक्ती स्वत:चे संतुलन राखू शकला नाही अन् क्षणार्धात तो पाण्यात दिसेनासा होतो. स्कूटरसह ती व्यक्ती वाहून जाते. ही घटना एका प्रत्यक्षदर्शीने रेकॉर्ड केली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पावसाळा जवळ येत असल्याने आणि येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने राज्यात लोकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशा व्हिडीओमुळे प्रशासनाने कोणतीही तयार केलेली नाही हे स्पष्ट होते.

इंटरनेट वापरकर्ते कमी वेळात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील बिकट परिस्थितीबद्दल सरकारवर टीका करत आहेत. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी ते करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाल्यांची अपुरी साफसफाई झाल्यामुळे रस्ते पाण्याखाली असल्याचे दाखवणारे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर समोर येत आहेत. यापूर्वी काल महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडला. राज्यात काही भागात पाणी साचले. पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला कारण अनेक भागात पाणी साचले. अंधेरी येथील सबवेमध्ये पाणी साचले होते ज्यामुळे तो तात्पुरता बंद करावा लागला.