Tiger attack viral video: अलीकडे वाघांच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. काही खरे असतात, तर काही फक्त लक्ष वेधण्यासाठी तयार केलेले असतात. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका नव्या व्हिडीओने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ जोरदारपणे व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वाघाने एका व्यक्तीवर हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतील फॉरेस्ट गेस्ट हाऊसमध्ये घडल्याचे म्हटले जाते. अनेक जण ही घटना खरी समजत आहेत, तर काहींना हा एआयच्या मदतीनी तयार केलेला बनावट व्हिडीओ असल्याचा संशय आहे.

हा व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजसारखा दिसतो आणि त्यावर ‘६.४२’ अशी वेळ दिसते. त्यामुळे हा व्हिडीओ ताजा आणि खरा असल्याचा अनेकांचा समज झाला आहे. व्हिडीओमध्ये वाघ अचानक एका व्यक्तीवर झडप घेऊन, त्याला ओढत नेतो, असं दिसतं. या दृश्यामुळे अनेकांना धक्का बसला असून, व्हिडीओला आतापर्यंत ५८,000 पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर काही वापरकर्ते या व्हिडीओबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाले, “हा पूर्णपणे बनावट व्हिडीओ आहे, एआयने तयार केलेला व्हिडीओ आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “एआयने बनवलेला व्हिडीओ खूपच खऱ्यासारखा वाटतो; पण काही चुका स्पष्ट दिसतात.” काहींनी मात्र इशारा दिला की, “वाघासारख्या वन्य प्राण्यांना कधीही कमी लेखू नये, त्यांचं वर्तन अनपेक्षित असतं.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या एक्स @Himmu86407253 अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. वन विभागाने लोकांना सांगितले आहे की, असे बनावट किंवा दिशाभूल करणारे व्हिडीओ शेअर करू नयेत. अशा अफवांमुळे लोकांमध्ये अनावश्यक भीती आणि गोंधळ निर्माण होतो. वाघ असलेल्या भागांमध्ये अशा व्हिडीओं,मुळे भीती पसरू शकते. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता फक्त खऱ्या आणि खात्रीशीर माहितीवरच भरवसा ठेवावा, असा सल्ला वन विभागाने दिला आहे.

या व्हायरल व्हिडीओवर शेवटी वन विभागाने प्रतिक्रिया दिली आहे. रेंज फॉरेस्ट ऑफिसर सचिन नाराड म्हणाले, “हा व्हिडीओ ब्रह्मपुरीचा नाही आणि आमच्या विभागाशी त्याचा काहीही संबंध नाही.” त्यांनी सांगितले की, हा व्हिडीओ नेमका कुठे काढला आहे हेही माहीत नाही. तसेच त्यांनी सांगितले की,हा व्हिडीओ बहुतेक एआयच्या मदतीनं तयार केला असावा.