Train Phone Stolen Viral Video : ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना खूप काळजी घ्यावी लागते. कारण- अनेकदा त्यांना चोरीच्या घटनांचा सामना करावा लागतो. या घटना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून सतत प्रयत्न केला जातो. त्यासाठी आता आरपीएफने एक अनोखी जागरूकता मोहीम राबवली आहे, ज्यात रेल्वे पोलिस प्रवाशांना फोनचोरीच्या घटना कशा टाळता येऊ शकतात हे शिकविताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक आरपीएफ जवान ट्रेनच्या जनरल डब्यातील अप्पर सीटवर झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून मोबाइल काढतात; पण प्रवाशाला त्याचा काहीच पत्ता नाही. त्यानंतर जवान त्या प्रवाशाला उठवतो आणि विचारतो की, तुमचा मोबाईल कुठे आहे? हे ऐकून प्रवासी घाबरतो आणि त्याचा मोबाईल शोधू लागतो. दरम्यान, पोलिस त्याला मोबाईल परत करतात आणि सांगतात की, मोबाइल शर्टच्या वरच्या खिशात ठेवून गाढ झोपणे ही मोठी चूक आहे.
दरम्यान, आरपीएफ जवान प्रवाशांना आणि ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या इतर सर्व प्रवाशांना मोबाईल नेहमी पँटच्या खिशात ठेवण्याचा सल्ला देतात. असे केल्याने चोरांना खिशातून मोबाईल काढणे शक्य होत नाही आणि मोबाईलचोरीची शक्यताही कमी होते.
हा व्हिडीओ @geetappoo नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे; तर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटले की, हा एक चांगला उपक्रम आहे. लोकांना जागरूक केल्याबद्दल धन्यवाद. दुसऱ्या युजरने कमेंट केली की, मोटा भाईंनी काय अभिनय केला आहे, इतक्या मोठ्या आवाजातही तो शांत झोपला.