माणसांनी स्वत:च्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली. प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट केले. त्यामुळे अनेक प्रजाती नष्ट झाल्या तर काही जगण्यासाठी संघर्ष करू लागल्या. त्यांचं खाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण वाढलं. याचे अनेक व्हिडिओ, फोटो आपण पाहिले असतील. काही दिवसांपूर्वी ताडोबा अभयारण्यानजीक असाच एक प्रकार घडला. यात रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना दोन वाघांनी घेरलं वाघाच्या कचाट्यात सापडलेल्या या दुचाकीस्वाराचा थरार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दोन तरुण दुचाकीनं रस्त्यावरून जात होते, पण अचानक एका वाघानं त्यांना घेरलं. एका वाघाच्या तावडीतून निसटण्याचा ते प्रयत्न करत असतानाच दुसरं संकट दत्त म्हणून त्यांच्या समोर उभं राहिलं. कारण दुसरा वाघही जंगलातून त्यांच्या समोर आला होता. या दुचाकीस्वारांनी जराही हालचाल केली असती तर नक्कीच वाघांनी त्यांच्यावर हल्ला केला असता. पण, या दोघांनी कमालीचा संयम दाखवत वाघांच्या कचाट्यातून आपली सुटका करून घेतली. रस्त्यावर असणाऱ्या जिप्सीतील काही पर्यटकांनी हा थरार कॅमेरात कैद केला. या दुचाकीस्वारांना वाघांच्या तावडीत सापडलेलं पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या माणसांच्या अंगावरही भीतीनं काटा आला.