Prayagraj Cop Performs Ritual To Ganga Floodwater Video : गेल्या कही दिवसांपासून उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे गंगा नदीला पूर आला आहे. पुरामुळे अनेक भागांत प्रचंड पाणी साचले आहे. रस्तेच नाही तर लोकांच्या घरातही पुराचे पाणी शिरलेय. घरात छातीभर पाणी भरल्याने अनेकांना घरं सोडवी लागतायत. लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. याचदरम्यान सोशल मीडियावर पोलिस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये उत्तर प्रदेशच्या एका पोलिस उपनिरीक्षकाच्या घरातही गंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरलयं, पण ते पाणी काढायचं सोडून तो चक्क त्यात स्नान करत, दूध-फुलं अर्पण करत पूजा करताना दिसतोय. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलेय.
प्रयागराज येथील रहिवासी असलेले पोलिस उपनिरीक्षक चंद्रदीप निषाद यांचे गंगा नदीच्या अगदी जवळच घर आहे, पण नदीला पूर आल्याने त्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलयं. याच पुरादरम्यानचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यामध्ये ते त्यांच्या घराबाहेर पाण्यात उभे राहून गंगा नदीला दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या अर्पण करताना दिसतायत. यावेळी ते गंगा मैया स्वत: दारात आल्याने तिची पूजा केली असे म्हणतायत.
दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ते पुराच्या पाण्यात पोहताना आणि बुडी मारताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ते मंत्र जप करताना पाण्यात डुबकी मारत आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आज सकाळी मी ड्युटीसाठी निघत असताना, माँ गंगा आमच्या घरी आली. दारात मी माँ गंगेची पूजा करून आशीर्वाद घेतला, जय गंगा मैया.’
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी हास्यास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर अनेकांनी पावसाळ्यासाठी प्रशासनाने केलेल्या कामाची कशाप्रकारे पोलखोल झाली असे म्हटले आहे. यूपीतील अनेक गावे आणि शहरे गंगा नदीच्या पुराच्या विळख्यात सापडली आहेत. हा व्हायरल व्हिडीओ स्वतः उपनिरीक्षकाने त्यांच्या @si_chandradeep_nishad या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, ‘आपण इतके पाप केले आहे की गंगा मातेला स्वतःला यावे लागले!’ दुसऱ्याने म्हटले, ‘इंडियन अॅक्वामॅन! इथे अटलांटीपूर बांधले जात आहे का?’ काही युजर्सनी चिंताही व्यक्त करत म्हटले की, ‘त्यांनी सरकारी व्यवस्थेची स्थिती किती वाईट आहे हे दाखवून दिले आहे.’