२०१७ च्या उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी भाजपाने चांगलीच कंबर कसली आहे. अशातच मोदींच्या स्वागतासाठी वाराणसीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेले पोस्टर आता चांगलेच वादात सापडले आहेत. या पोस्टरवर भारतीय सैनिकांऐवजी चक्क अमेरिकन सैन्याचे फोटो लावण्यात आले आहेत. वाराणसी महानगरच्या वतीने लावण्यात आलेल्या या पोस्टरच्या खाली हातात बंदुका घेऊन असलेल्या सैनिकांचा फोटो लावण्यात आला आहे. पण दुदैव म्हणजे हा अमेरिकेतल्या ‘१०१ एअरबॉर्न डिव्हिजन’च्या सैनिकांचा फोटो आहे. ‘बँड ऑफ ब्रदर्स’ या प्रसिद्ध अशा मालिकेच्या पोस्टवर देखील हा फोटो लावण्यात आला होता.
उरी येथेली हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकव्याप्त काश्मीमरमध्ये शिरुन सर्जीकल स्ट्राईक्स करत पाकिस्तानी दहशतवाद्यांची तळ उद्धवस्त केली होती. पण भाजप राजकिय फायद्यासाठी सैनिकांचा वापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी भारतीय सैन्य हाच भाजपाच्या प्रचाराचा हुकमी एक्का राहिल असेही मत अनेकांनी मांडले, त्यामुळे भाजपाच्या प्रचारात भारतीय सैनिकांची छायाचित्र अग्रस्थानी असतील यात काही शंकाच नाही. पण ज्याने देशासाठी प्राण लावले त्यांचे फोटो पोस्टरवर लावण्याऐवजी अमेरिकन सैनिकांचे छायाचित्र का लावले अशा टीका सोशल मीडियावर होत आहेत. दुर्दैव म्हणजे ज्या अमेरिकन सैनिकांचे हे फोटो आहेत ते १० वर्षांपूर्वी इराक युद्धाच्या वेळी काढले होते. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल होत आहे.
