UP principle facial video: कोणत्याही शाळेत मुख्याध्यापक हे पद सर्वात महत्त्वाचे असते. शाळा चांगल्या पद्धतीने चालवण्याची आणि शाळेत शिस्त पाळण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर असते. पण, एखाद्या शाळेचे मुख्याध्यापकच नियमांच्या विरुद्ध वागत असतील तर? असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील बिघापूर येथील दादामाळ प्राथमिक शाळेत घडला आहे.
यात एका मुख्याध्यापिकेने शाळेतच पार्लर स्टाफला बोलावून फेशियल करून घेतले. यावेळी एका शिक्षिकेने त्यांना पाहिले आणि व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. शिक्षिकेला हे करताना पाहून मुख्याध्यापिका संतापली आणि दोघींचे भांड झाले, हे प्रकरण इतके वाढले की, मुख्याध्यापिकेने शिक्षिकेलाच मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
शाळेच्या किचनमध्ये बसून करत होती फेशियल
शिक्षिका व्हिडीओ काढत असल्याचे पाहून मुख्याध्यापिका संतापली आणि तिने शिक्षिकेच्या दोन्ही हातांवर चावा घेतला आणि नंतर विट उचलून मारली, यात शिक्षिका जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. @ManojSh28986262 या एक्स अकाउंटवरून दोन व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला शाळेच्या स्वयंपाकघरात मुख्याध्यापिका कशाप्रकारे फेशियल करतेय हे दिसेल.
पहिल्या व्हिडीओत मुख्याध्यापिका शिक्षिकेच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. दुसऱ्या व्हिडीओमध्ये शिक्षिका तिचा हात दाखवताना दिसत आहे, ज्यामध्ये दातांनी चावल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. तसेच यामुळे हातावर झालेल्या जखमेतूनही रक्त येत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी मुख्याध्यापिकेविरोधात बिघापूर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.
या पोस्टला उत्तर देताना उन्नाव पोलिसांनी लिहिले की, बिघापूर पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित कलमांतर्गत मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यानंतर आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्सनेही तीव्र संताप व्यक्त केला आहे.