एक तीळ सात जणांनी वाटून खावा असा एक वाक्प्रचार आहे. सर्वांना वाटेकरी झाल्यास समाधान लाभते. परंतु तीळ तर लहान असतो. तो कसा वाटून खावा? हा प्रश्न कुणालाही पडतो. पण हे जाऊद्या यवतमाळ येथील एका कलावंताने एका तिळाचे १०० तुकडे केले आहेत. कोण आहे हा महाशय? जाणून घ्या
कोण आहे हा कलावंत?
पुसद येथील अभिषेक सूर्यकांत रुद्रवार या मनस्वी कलावंताने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने १६ मिनिटं २० सेकंदात चक्क शंभर तुकडे करत रेकॉर्ड केला. त्याच्या या अभिनव कृतीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. त्याला पदक, प्रशस्तीपत्र, ओळखपत्र आणि पेन देऊन या संस्थेतर्फे गौरव करण्यात आलं आहे.
(हे ही वाचा: भारतीय जवानाचा गुडघाभर बर्फात कणखरपणे उभा असलेला व्हिडीओ Viral; देशवासीयांनी मानले आभार)
बनवल्या आहेत अनेक कलाकृती
पुसद शहरातील विटावा वॉर्डातील अभिषेक सध्या नांदेड येथील एमजीएम कॉलेज मध्ये बीएफए अंतिम वर्षाला शिकत आहे. मायक्रो आर्ट हा त्याच्या आवडीचा विषय आहे.त्याने आतापर्यंत मोहरी, तांदूळ, हराळी, सुपारी, खडू, पेन्सिल, माचीसची काडी यावर गणपतीचे चित्र रेखाटले आहे. तिळावर चक्क त्याने ए,बी,सी,डी यासारखे इंग्रजी मुळाक्षरे तर १ ते १० पर्यंतचे अंक लिहिले आहेत. तसेच पेन्सिलच्या टोकावर त्याच्या कलेतून माहूरची रेणुका, कोल्हापूरची देवीही साकारली आहे. वाळलेल्या पानांवर कटिंग करून बुद्ध,शिवराय यासारख्या महापुरुषांचे चेहरे साकार करणे,एक रूपयाच्या नाण्यावर विविधरंगी निसर्ग चित्र रेखाटणे,आपट्याच्या पानावर सुरेख निसर्गरंग भरणे असा कलात्मक छंद अभिषेकने जोपासला आहे.
(हे ही वाचा: Viral Video: लग्नात नवरदेव करत होता डान्स तेव्हाच, नवरीने काढली चप्पल आणि…)
(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)
गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची तयारी
याशिवाय जुन्या नाण्यांचा मोठा संग्रह अभिषेक कडे आहे. तांदळाच्या दाण्यावर तो सहजतेने झेंडा रेखाटतो. संक्रांतीला पतंग तांदूळ दाण्यावर काढतो. विशेष म्हणजे अक्षरांमधून गणपतीचे रूप तो सहजतेने साकारतो. त्याने तयार केलेली अक्षर गणपतीची रूपे अक्षरशः मनाला भुरळ पाडतात. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर आता त्याला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद करावयाची आहे. त्या दृष्टीने त्याची तयारी सुरू आहे.