उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असतात. त्यांना जी गोष्ट आवडते, ज्या गोष्टीने ते प्रभावित होतात, अशा गोष्टी ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतात. अनेकदा ते विविध लोकांच्या बुद्धी कौशल्याचे आणि कल्पकतेचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहनही देतात. आज त्यांनी असाच एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर रिट्वीट केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की काही लोकांनी पुराच्या पाण्याने वेढलेला रस्ता पार करण्यासाठी चक्क क्रेनची मदत घेतली आहे. महिंद्रा यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “इच्छा तेथे मार्ग.” देशाचे आयटी हब असणाऱ्या बंगळुरूमध्ये पावसाने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर पाणी साचलेल्या रस्त्यावरून मार्ग काढण्यासाठी ट्रॅक्टर आणि क्रेनचा वापर करणाऱ्या लोकांचे फोटो आणि व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून टीव्ही आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पूर आलेला रस्ता ओलांडण्यासाठी आठ लोक क्रेनवर चढलेले दिसत आहेत. त्यापैकी दोन ड्रायव्हरजवळ, तर इतर लोक खोदकामाला वापरण्यात येणाऱ्या ब्लेडवर उभे आहेत. लोकांनी चांगले कपडे घातलेले असून ते आयटी हबमधील एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असणारे कर्मचारी वाटतात. साचलेल्या पाण्यातून वाट काढत ऑफिसला जाण्यासाठी त्यांनी क्रेनची मदत घेतली असल्याचे समजते.
नमकीन विकणाऱ्याचा हटके अंदाज पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही व्हाल त्याचे फॅन
व्हिडीओ शेअर करताना, एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले की, ‘बेंगळुरूला उगाचच इनोव्हेशन हब म्हटले जात नाही.’ कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी या जुगाडाचे कौतुक केले आहे. तर काहीही राज्यसरकार आणि नागरी अधिकाऱ्यांवर टीका केली आहे. दरम्यान हा व्हिडीओ आतापर्यंत पाच लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.