पंजाब म्हटलं तरी आपल्याला तेथील विविध खाद्यपदार्थ डोळ्यासमोर येतात. येथील ‘सरसो दा साग’, ‘मक्के दी रोटी’, मलाईदार लस्सी, तंदुरी चिकन, बटर चिकन, अमृतसरी कुलचे, छोले यांसारखे असंख्य पदार्थ केवळ देशभरातच नव्हे, तर जगभरात लोकप्रिय आहेत.अशाच या चविष्ठ परंपरेत आता नवा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्यामुळे नवा वाद पेटला आहे.या अनोख्या डिशने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे आणि अमृतसरमधील एका जोडप्याने तयार केलेल्या या विचित्र खाद्यपदार्थाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. या वादग्रस्त रेसिपीचं नाव आहे – ‘शराबी मटण’.
अमृतसर, पंजाबमधील एक खाद्य विक्रेता आपल्या या अनोख्या पदार्थामुळे सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. या पदार्थाचे नाव ‘शराबी मटण’ असून, ते मटणात मद्य घालून आणि भरपूर तूप वापरून तयार केले जाते. या डिशमुळे स्थानिक आणि ऑनलाइन खाद्यप्रेमींमध्ये वाद निर्माण झाला आहे.
व्हिडीओमध्ये विक्रेता आणि त्याची पत्नी ‘द वॉकिंग स्ट्रीट’ नावाच्या त्यांच्या फूड स्टॉल आणि रेस्टॉरंटमध्ये मटण तयार करताना थेट त्यात मद्य ओतताना दिसत आहेत. नंतर ते मटणाची चव वाढवण्यासाठी तुपात तळतात. व्हिडीओमध्ये ग्राहक उत्सुकतेने पाहताना दिसत आहेत आणि विक्रेत्याने सांगितले आहे की, तो फक्त नावासाठी नाही, तर प्रत्येक पदार्थामध्ये शुद्ध देशी तूप वापरतो, जे इतर रेस्टॉरंट्समध्ये क्वचितच पाहायला मिळते.
पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर तो लाखो लोकांनी पाहिला आहे आणि त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही लोकांनी या क्रिएटिव्ह पदार्थाचं कौतुक केलं, तर काहींनी शंका व्यक्त करीत विचारणा केली की, उघडपणे दारू पिणे कायदेशीर आहे का? तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. @HPhobiaWatch या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, त्याखाली लिहिले आहे, “हे काय कायदेशीर आहे का? त्यांच्याकडे बार लायसन्स आहे का? जर मुलांनी खाल्ले तर?
त्याउलट फूडप्रेमींनी म्हटले की, स्वयंपाकात अल्कोहोलचा वापर सामान्य आहे आणि जेव्हा ते तयार केले जाते तेव्हा मद्य जाळून टाकले जाते, फक्त चव आणि सुगंध शिल्लक राहतो. काहींनी लिहिले, “स्वयंपाक करताना मद्याचे पूर्णपणे बाष्पीभवन होते. फक्त थोडेसेच शिल्लक राहते, जे नगण्य असते.” आणखी एका वापरकर्त्याने म्हटले, “ही सामान्य पद्धत आहे. वाद घालायचे काही कारण नाही.” “मद्याचा उकळण्याचा बिंदू पाण्यापेक्षा कमी असतो. म्हणून जर ते योग्यरीत्या शिजवले, तर मद्य जवळजवळ पूर्णपणे निघून जाते.” दुसऱ्याने लिहिले, “याला डिग्लेझिंग म्हणतात. स्वयंपाकी चव वाढवण्यासाठी मद्य वापरतात, मद्य उकळवून जाळले ? जाते आणि मग फक्त सुगंध व चव राहते. बार लायसन्सची गरज नाही.”
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, लोकांमध्ये ‘शराबी मटण’च्या फूड स्टॉलमध्ये केल्या जाणाऱ्या अनोख्या प्रयोगावर चर्चा रंगली आहे.