Fact Check Tiger Viral Video : अलीकडच्या काळात सोशल मीडियावर माणसांच्या आणि प्राण्यांच्या विचित्र भेटींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काहींमध्ये सहानुभूती दिसते, तर काहींमध्ये धक्कादायक वर्तन पाहायला मिळतं. अशाच एका व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं . मध्य प्रदेशातील पेंच परिसरात एका माणसानं वाघाला थोपटून त्याला दारू पाजल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. व्हिडिओ पाहणाऱ्यांना तो इतका वास्तवदर्शी वाटला की,”अनेकांनी ती घटना खरी असल्याचं मानलं. मात्र, तपासाअंती समोर आलं की,हा व्हिडिओ वास्तव नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AI-Generated बनावट चमत्कार आहे.”
काय आहे दावा?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, पेंचमधील ५२ वर्षीय राजू पाटेल नावाचा एक मजूर रात्रीच्या दारूच्या नशेत रस्त्यावर फिरताना त्याला ‘वाघ’ दिसला आणि त्याला एखाद्या पाळीव प्राण्यासारखा थोपटू लागला. नंतर त्यानं त्याला दारूही पाजली. त्या पोस्टबरोबर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या प्रकाशात एक माणूस वाघाजवळ उभा राहून बाटली दाखवत असल्याचं दिसतं — अगदी वास्तवदर्शी दृश्य असल्यामुळे अनेकांनी तो खरा CCTV फुटेज समजून घेतला.
सत्य काय आहे?
फॅक्ट-चेकर्सनी केलेल्या तपासानुसार हा व्हिडिओ पूर्णपणे AI तंत्रज्ञानाने तयार करण्यात आला आहे. पेंचच्या वनविभागा किंवा कोणत्याही स्थानिक प्रशासनानं अशा घटनेची पुष्टी केलेली आहे.या कथित “राजू पाटेल” प्रकरणाविषयी कोणत्याही विश्वसनीय माध्यमानं बातमी प्रसिद्ध केलेली नाही.
तपासाअंती समोर आलं की, ही “गोष्ट” काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी गंमत म्हणून तयार केली असून, अनेक पेजेस आणि अकाउंट्सनी ती जसंच्या तशी कॉपी करून शेअर केली. म्हणजेच हा आणखी एक ‘व्हायरल फेक’ प्रकारचा व्हिडिओ आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया काय सांगतात?
या व्हिडिओखाली लोकांनी मोठ्या प्रमाणावर विनोदी कमेंट्स केल्या आहेत. कोणीतरी लिहिलं, “राजूच्या दारूची रेसिपी कुठे मिळेल?” तर दुसऱ्या युजरनं म्हटलं, “AI आता एवढं वास्तवदर्शी बनलंय की, आम्हीही फसतोय.”
एकाने मजेशीर कमेंट केली – “राजूवर पोलिस संरक्षण ठेवण्यात आलं आहे, कारण स्थानिक पुरुष मंडळी त्याच्याकडून देशी दारूची रेसिपी मागत आहेत!”
तर काहींनी विचारलं – “हा व्हिडिओ तयार करण्यासाठी कोणतं AI टूल वापरलं?”
तज्ज्ञांचा इशारा
AI-Generated कंटेंट आता इतकं खऱ्यासारखं वाटू लागलं आहे की, सामान्य लोकांसाठी खोटं आणि खरं यात फरक करणं अवघड होतंय. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अशा “प्राण्यांशी संबंधित” किंवा “अविश्वसनीय प्रसंगांच्या” व्हिडिओंकडे नेहमी शंका घेऊन पाहायला हवं. वअनेकदा हे व्हिडिओ “एंगेजमेंट फार्मिंग” (म्हणजे फॉलोअर्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी बनवलेले) असतात.
निष्कर्ष
दावा : मध्य प्रदेशातल्या पेंचमध्ये राजू पाटेल नावाच्या व्यक्तीनं वाघाला दारू पाजली.
फॅक्ट चेक : हा व्हिडिओ AI-Generated असून, अशी कोणतीही वास्तविक घटना घडलेली नाही.
म्हणूनच हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.
